News Flash

कल्याण-डोंबिवलीत विक्रमी करवसुली

गेल्या ३१ वर्षांत पहिल्यांदाच मालमत्ता करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने मालमत्ता कराच्या वसुलीचे ४२५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट पार करत यंदा ४२७ कोटी ५० लाख रुपयांची वसुली केली आहे. करोना काळातही उद्दिष्टापेक्षा दोन कोटी ५० लाख रुपयांची जास्त वसुली करण्यात पालिका प्रशासनाला यश आले असून गेल्या ३१ वर्षांत पहिल्यांदाच मालमत्ता करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले आहे.

गेली अनेक वर्षे मालमत्ता करापोटी ठरवून दिलेल्या उद्दिष्टापेक्षा ६० ते ७० कोटींची वसुली कमी होत असल्याचे चित्र होते. कर निर्धारक व संकलक विनय कुळकर्णी यांच्यासह प्रभागांमधील कर विभागातील अधिकाऱ्यांना करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले होते.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये प्रशासनाने तीन महिन्यांची अभय योजना लागू केली होती. थकीत मालमत्ता कर एकरकमी भरला तर त्यावर ७५ टक्के सूट पालिकेने दिली होती. या योजनेला करदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन पालिकेच्या तिजोरीत २३० कोटी ८५ लाखांचा कर भरणा केला. करवसुलीचा लक्ष्यांक पूर्ण करण्यासाठी ३१ मार्च या दिवशी १० प्रभागांमधून एकूण १० कोटी ७८ लाख रुपयांची करवसुली कर्मचाऱ्यांनी केली. मागील वर्षीपेक्षा या वर्षी १३४ कोटींची वाढीव करवसुली करण्यात आली आहे. थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करून लिलावाच्या सूचना केल्या होत्या. महामारीमुळे अभय योजना लागू केली होती. या सर्वांचा एकत्रित परिणाम आणि कर कर्मचाऱ्यांची अथक मेहनत म्हणजे कर वसुलीचा लक्ष्यांक पूर्ण होण्यास खूप मदत झाली, असे मालमत्ता कर विभागाचे करनिर्धारक व संकलक विनय कुळकर्णी यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2021 12:02 am

Web Title: record tax collection in kalyan dombivali akp 94
Next Stories
1 गुन्हे रोखण्यासाठी पोलीस सक्रिय
2 महिनाभरात पालिकेची १६ लाख दंडवसुली
3 दंड निश्चिाती, पण वसुली शून्य
Just Now!
X