News Flash

चिंचणीमध्ये लाल मानेच्या फलारोपचे दर्शन

एका दुर्मीळ जातीच्या लाल मानेच्या फलारोप पक्ष्याचे दर्शन पक्षी निरीक्षकांना चिंचणी तेथे घडले आहे.

फलारोप या पक्षाची मान विणीच्या हंगामात लाल असते, इतर वेळी मात्र त्याची मान पांढऱ्या रंगाची असते.

पालघर जिल्ह्यास भरभरून पक्षीवैभव लाभले आहे. समुद्रकिनारी, खारफुटीचा प्रदेश, मिठागरे, भातशेती, जंगल इत्यादी भागांत विविध पक्षी पाहावयास मिळतात. अशाच एका दुर्मीळ जातीच्या लाल मानेच्या फलारोप पक्ष्याचे दर्शन पक्षी निरीक्षकांना चिंचणी तेथे घडले आहे.

नेस्ट संस्थेचे सदस्य व पक्षीमित्र आशीष बाबरे हे नेहमीप्रमाणे त्यांच्या मुलासोबत पालघर जिल्ह्यातील चिंचणी येथे कलोली खाडी परिसरात पक्षी निरीक्षण करावयास गेले असता त्यांना दुर्मीळ अशा लाल मानेच्या फलारोप पक्षाचे दर्शन घडले. या वेळी दोन लाल मानेचे फलारोप खाडी परिसरातील उथळ पाण्याच्या ठिकाणी खाद्याचा शोध घेताना दिसून आले. या पक्ष्यांच्या अतिशय वेगळ्या अशा खाद्य शोधण्याच्या सवयीमुळे ते फलारोप पक्षी असल्याचे त्यांच्या ध्यानात आले. हे पक्षी उथळ पाण्यात गोल फिरत अतिशय जलद गतीने चोच मारत जलीय किडे, झिंगे असे प्राणी टिपतात. इतिहासातील तुरळक नोंदीमुळे चिंचणी येथे झालेले त्यांचे दर्शन महत्त्वपूर्ण मानले जाते, असे नेस्टचे अध्यक्ष व पक्षी अभ्यासक सचिन मेन यांनी सांगितले. तर बाबरे यांच्या या दुर्मीळ नोंदीमुळे परिसरातील सर्व पक्षीप्रेमींनी त्यांचे कौतुक केले आहे.

पक्षाचे मूळस्थान

  • लाल मानेच्या फलारोप पक्ष्याचे मूळ निवासस्थान हे युरेशिया व उत्तर अमेरिकेतील आक्र्टिक प्रांतातले असून तेथे त्याची वीण होते.
  • हिवाळ्यात येथे बर्फवृष्टी झाली की या पक्ष्यांना खाद्याचा तुटवडा भासू लागतो.
  • त्या वेळी हे पक्षी भारतासारख्या उष्ण कटिबंधीय देशाकडे स्थलांतर करतात.
  • महाराष्ट्रात यापूर्वी नागपूर, अमरावती, उरण येथे हा पक्षी दिसल्याची नोंद आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2016 1:15 am

Web Title: red necked phalarope bird
Next Stories
1 ठाण्यात आजपासून दूधविक्री बंदीची शक्यता
2 एकनाथ शिंदे यांच्या पुत्राच्या विवाहात चलनउधळण
3 दळण आणि ‘वळण’ : ‘कॅशलेस’ प्रवास!
Just Now!
X