१० कोटींच्या निधीला मंजुरी, दुमजली कार्यालयाची उभारणी

कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वाढत्या पसाऱ्याच्या तुलनेत आता अस्तित्वात असलेली वास्तू अत्यंत अपुरी आहे. त्यामुळे इथे कामानिमित्ताने येणाऱ्या वाहनचालकांची गैरसोय होते. परिवहन कार्यालयाची आता या कोंडीतून लवकरच सुटका होणार आहे. राज्य शासनाच्या परिवहन विभागाने नुकताच आरटीओ कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी १० कोटींचा निधी मंजूर केला असून यातून कार्यालयाची दुमजली इमारत उभी राहणार आहे. त्यामुळे येथील व्यवहार सोपे होण्यास मदत होणार आहे.

डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर तर दुसरीकडे शहाड, कल्याण ग्रामीणचा भाग, टिटवाळा अशा मोठय़ा लोकसंख्येच्या भागाला आपल्या वाहनाच्या संबंधातील कामांसाठी कल्याणच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे या कार्यालयात नेहमीच गर्दी पाहायला मिळते. विविध वाहन परवाने, परवाना नूतनीकरण, वाहन क्रमांकमिळवणे, भंगारातील, जप्त केलेली वाहने ठेवणे अशा विविध कामांसाठी कल्याणच्या आरटीओ कार्यालयात दरदिवशी शेकडो नागरिक येत असतात. मात्र चाळवजा कार्यालये, वाहनचालकांना बसण्यासाठी पुरेसी जागा नसणे, तोकडे छप्पर, त्यात यंत्रणेतील फोलपणाचा अनेकदा वाहनचालकांना फटका बसतो.

पावसाळ्यात तर कार्यालयासमोरील जागेत तळे साचल्याने वाहनचालकांना चालणेही मुश्कील होत असते. त्यात छपराअभावी पावसात कागदपत्रे घेऊन उभे राहावे लागते. अभिनेता सचिन देशपांडे याने गेल्या पावसाळ्यात या समस्येला सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचा फोडली होती. या कार्यालयाचे रूप पालटावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. या कार्यालयासाठी वाडेघर येथील आरक्षण क्रमांक ५५ मधील ८ हजार २२० चौरस मीटरचे क्षेत्र मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे येथे कार्यालय स्थलांतरित करायचे असल्यास फक्त निधीची तरतूद हवी होती. अखेर राज्य शासनाने या निधीला मंजुरी दिली आहे. महापालिकेच्या पथकाने दररोज या भागात महापालिकेच्या पथकाने दररोज या भागात येऊन कारवाई करावी, अशी मागणी या भागातील रहिवाशांनी केली आहे.या रस्त्याच्या दुतर्फा निवासी इमारती आहेत. रहिवाशांना आपली वाहने इमारतीमधून बाहेर काढायची असतात. फेरीवाले रस्ता अडवून बसल्याने आणि ते बाजूला हटण्यास तयार नसल्याने रहिवाशांची अडचण होते.

निधीची तरतूद

  • राज्य शासनाच्या गृह विभागातील परिवहन शीर्षांत कल्याणच्या या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी १० कोटी ४६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
  • या निधीतून वाडेघर येथे दुमजली कार्यालय उभे करण्यात येणार आहे.
  • प्रत्येक मजल्याला ६७८ चौरस मीटरचे बांधकाम होणार असून त्यासाठी ५ कोटी २५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
  • पाणीपुरवठा, स्वच्छता, संरक्षक भिंत, अंतर्गत रस्ते, पर्जन्यजल संचयन प्रकल्प, अग्निशमन यंत्रणा आणि पार्किंग अशा कामांसाठी २ कोटी ५४ लाखांची निधी आहे.

मंजुरीनंतर काम सुरू  होऊन पूर्ण होण्यास एक ते दीड वर्षांचा कालावधी लागू शकतो. मात्र यामुळे सध्याच्या कार्यालयापेक्षा अधिक सुविधा आणि सुरळीत कामकाज करणे सोपे होणार आहे. – संजय ससाणे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण