05 August 2020

News Flash

वाहतूक नियमभंग करणाऱ्यांत घट

ठाणे पोलिसांनी वाहनचालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारल्याने वाहनचालकांमध्ये शिस्त दिसून येत आहे.

ठाणे वाहतूक पोलिसांचा दावा

किशोर कोकणे, ठाणे

ठाण्यात बेशिस्तपणे वाहन चालविणाऱ्यांविरोधात गेल्या वर्षभरापासून ठाणे वाहतूक पोलिसांनी जोरदार कारवाई करण्यास सुरुवात केल्याने दारू पिऊन वाहन चालविणारे, सिट बेल्टचा वापर टाळणे, वाहन क्रमांकाची फॅन्सी पाटी, कर्णकर्कश हॉर्न वाजविणे अशा प्रकारांमध्ये कमालीची घट झाल्याचा दावा वाहतूक पोलिसांनी केला आहे. वाहनचालकांमध्ये सुरू असलेली जनजागृती आणि पोलिसांचा धाक यामुळे ही घट झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरांमध्ये पुरेशी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने या शहरांतील अनेक जण स्थानक परिसर किंवा मुंबई गाठण्यासाठी खासगी वाहनांचा वापर करतात. मुंबईत वाहतुकीचे नियम पाळणारे हेच वाहनचालक ठाण्याच्या वेशीवर आल्यावर नियमांचे उल्लंघन करण्यास सुरुवात करतात. यामुळे अपघातांच्या घटनांमध्येही वाढ झालेली होती. त्यामुळे अशा प्रकारच्या वाहनचालकांवर आळा घालण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी मोहीम राबवली होती. याचा सकारात्मक परिणाम दिसू लागलेला आहे, असा ठाणे पोलिसांचा दावा आहे.

ठाणे पोलिसांनी वाहनचालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारल्याने वाहनचालकांमध्ये शिस्त दिसून येत आहे. यावर्षी १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर या कालवधीत पोलिसांनी दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या ७ हजार ३७० जणांविरोधात कारवाई केली आहे. हे प्रमाण २०१८ मध्ये या कालावधीत ११ हजार १२ इतके होते. तर कारमध्ये वाहनचालकांकडून सिट बेल्टही वापरण्यात येत नव्हते. २०१८ मध्ये पोलिसांनी १७ हजार ९७२ कारचालकांविरोधात कारवाई केली होती. तर, यावर्षी १५ हजार ७८ वाहनचालकांविरोधात कारवाई झाली. तर, कारला काळ्या रंगाची काच लावून फिरणाऱ्यांविरोधातही पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला होता. यावर्षी १० हजार ९५९ कारचालकांविरोधात कारवाई करण्यात आली. गेल्या वर्षी हे प्रमाण १३ हजार १११ इतके होते. कर्णकर्कश हॉर्न तसेच फॅन्सी क्रमांकाची पाटी बसविणाऱ्यां-विरोधातही पोलिसांनी कारवाई केल्याने या प्रकारांमध्येही कमालीची घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.

विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई

विना हेल्मेट दुचाकीस्वारांविरोधात पोलिसांनी कारवाईचा फास आवळला आहे. गेल्यावर्षी पोलिसांनी केवळ ९ हजार १२० दुचाकीचालकांविरोधात कारवाई केली होती. मात्र, यावर्षी या कारवाईमध्ये चौपट वाढ झालेली आहे. यावर्षी ४३ हजार ११९ विना हेल्मेट दुचाकी चालकांवर कारवाई केली. यात पोलिसांनी ३४ लाख ३८ हजार ८०० रुपये इतका दंड आकारलेला आहे. दुचाकी तसेच कारवर पोलीस आणि पत्रकार असलेले स्टिकर लावून वाहने चालविणाऱ्यांविरोधातही पोलिसांनी कारवाई केली. यावर्षी पोलिसांनी ७ हजार ७१६ जणांविरोधात कारवाई केली आहे. गेल्यावर्षी हा आकडा केवळ ५६३ इतका होता.

कारवाई                                                 २०१८             २०१९

भरधाव वाहनचालविणे                              ४८                  ३२

कर्णकर्कश हॉर्न                                       १४४८                २०५

मोबाइलवर बोलत वाहन चालविणे           ९९३६              ९०५२

फॅन्सी वाहन क्रमांक                                    २७१              १००६

दारू पिऊन वाहन चालविणे                      ११०१२           ७३७०

सिट बेल्ट न लावणे                                  १७९७२            १५०७८

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2019 4:10 am

Web Title: reduction in traffic violations thane traffic police claim zws 70
Next Stories
1 नऊवारीला शाही मस्तानी, पेशवाई, मयूरपंखी शिवण
2 मैदानाच्या भूखंडावर हॉटेलचे बांधकाम
3 हत्येप्रकरणी पुतण्यासह पाच अटकेत
Just Now!
X