उद्योजक, व्यापाऱ्यांना दिलासा; महामुंबईच्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडीही कमी होणार

ठाणे : उरण येथील जेएनपीटी बंदरातील मालाच्या ट्रक वाहतुकीला रेल्वेच्या मालगाडीचा पर्याय उपलब्ध असला तरी रेल्वेचे माल हाताळणी शुल्क महाग असल्यामुळे व्यापारी ट्रक वाहतुकीला पसंती देत आहेत. नेमकी ही बाब लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाने या शुल्कामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार ट्रक वाहतुकीपेक्षा हे शुल्क प्रत्येक टनामागे दोन हजार रुपयांनी कमी करण्यात आले आहेत. सरकारच्या या नव्या दरकपातीचा व्यापाऱ्यांनी फायदा घेतल्यास मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या शहरातील अवजड वाहतुकीची कोंडी काही प्रमाणात कमी होऊ शकेल, असा दावा केला जात आहे.

उरण येथील जेएनपीटी बंदरातून अवजड वाहनांची मोठय़ा प्रमाणात माल वाहतूक सुरू असते. मुंबई-आग्रा तसेच मुंबई-अहमदाबाद या दोन महामार्गावरून ही वाहतूक सुरू असते. त्यामुळे नवी मुंबई, मुंबई आणि ठाणे शहरांत अवजड वाहनांचा भार वाढून कोंडी होत आहे. दिवसेंदिवस या वाहनांच्या संख्येत वाढ होत असून यामुळे शहरांमधील कोंडीची समस्या अधिक बिकट होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी रेल्वे आणि वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी दिल्लीत एक नुकतीच बैठक घेऊन त्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. रेल्वे, जहाजबांधणी-नौकानयन आणि वाणिज्य या तीन विभागांच्या माध्यमातून शहरातील कोंडी सोडविण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी बुधवारी ठाण्यात पत्रकार परिषदेत दिली. उरण येथील जेएनपीटी बंदरातील मालाची वाहतूक करण्यासाठी ट्रक वाहतुकीबरोबरच रेल्वे मालगाडीचाही पर्याय उपलब्ध आहे. या बंदरातील मालाची चढ-उतार करण्यासाठी हाताळणी शुल्क आकारले जाते. मात्र, ट्रक आणि मालगाडीच्या शुल्कामध्ये मोठी तफावत आहे. रेल्वेचे शुल्क महाग असल्यामुळे व्यापारी ट्रक वाहतुकीला पसंती देतात. त्यामुळे शहरात अवजड वाहनांचा भार वाढून कोंडी होत आहे. ही बाब लक्षात घेऊन रेल्वे मालवाहतुकीला चालना देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने आता या शुल्कामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार मालगाडीचे शुल्क ट्रक वाहतुकीपेक्षा प्रत्येक टनामागे दोन हजार रुपयांनी कमी करण्यात आले आहे, असेही खासदार सहस्रबुद्धे यांनी सांगितले. व्यापाऱ्यांनी रेल्वे मालवाहतुकीला पसंती द्यावी आणि मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या शहरांतील अवजड वाहतुकीची कोंडी कमी व्हावी, या उद्देशातून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भिवंडीचा भार कमी होणार

उरण येथील जेएनपीटी बंदरात येणाऱ्या मालाची साठवणूक भिवंडीतील गोदामांमध्ये करण्यात येते. त्यासाठी जेएनपीटी बंदरातून भिवंडीच्या दिशेने अवजड वाहतूक सुरू असते तसेच भिवंडीच्या गोदामातून इतर ठिकाणीही अन्य वाहनांमार्फत वाहतूक सुरू असते. नौकानयन विभागाने आता जेएनपीटी ते मुंबई पोर्ट ट्रस्ट या मार्गावर जलवाहतुकीला चालना देण्यासाठी देकार मागविले आहेत. ही वाहतूक सुरू झाल्यानंतर मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे मालाची साठवणूक करण्यात येईल आणि त्यामुळे भिवंडीतील गोदामांच्या दिशेने होणाऱ्या अवजड वाहनांचा भार कमी होईल, असेही खासदार सहस्रबुद्धे यांनी सांगितले.

‘रो-रो’ वाहतूकही लवकरच

उरण येथील जेएनपीटी बंदरातून होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई शहरात कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी कोकण रेल्वेच्या मार्गावर रो-रो वाहतूक सेवा सुरू करण्यात येणार असून त्यासाठी मध्यंतरी वसई ते कोलाडपर्यंत चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी समोर आल्या आहेत. या अडचणी कशा प्रकारे दूर करता येऊ शकतात, याबाबतही बैठकीत चर्चा झाली आहे. त्यामुळे रो-रो वाहतूक सेवाही लवकरच सुरू होऊ शकेल, असा दावा खासदार सहस्रबुद्धे यांनी केला.