विविध वर्गातील १२३ कर्मचाऱ्यांची सेवा थांबविण्याचा निर्णय

बदलापूर : शहरात करोनाबाधितांची संख्या कमी झाल्यामुळे पालिकेच्या रुग्णालयातील अनावश्यक आरोग्य कर्मचाऱ्यांची सेवा खंडित करण्याचा निर्णय कुळगाव-बदलापूर नगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. आतापर्यंत १२३ आरोग्य कर्मचाऱ्यांची सेवा खंडित करण्यात आली आहे. दरम्यान, अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला असली तरी रुग्णसंख्या पुन्हा वाढल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांची पुन्हा भरती करण्यात येईल, असे पालिकेने स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांपासून बदलापूर शहरातील करोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. बदलापूर शहरात सध्या २० हजार ७२१ करोनाबाधित आढळून आले आहेत. ६ जून रोजी अवघे २० रुग्ण आढळून आले होते. शहरात रुग्ण बरे होण्याचा दरही वाढला असून तो सध्या ९७.३६ टक्क्यांपर्यंत गेला आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत गेल्या महिनाभरात कमालीची घट झाली आहे. शहरात सध्या २९१ रुग्णांवर उपचार सुरू असून त्यातील ६६ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत, तर २० रुग्ण शहराबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. त्यामुळे शहरातील ९ रुग्णालयांमध्ये अवघे २०५ रुग्ण उपचार घेत आहेत. यातील पालिका संचालित गौरी सभागृह आणि जान्हवी सभागृहाची क्षमता अनुक्रमे २५० आणि ५२ असली तरी त्यामध्ये अनुक्रमे १०८ आणि १३ रुग्ण उपचार घेत आहेत, तर पेंडूलकर सभागृहातील रुग्णालय आणि रेनी रेसॉर्ट येथील रुग्णालय बंद करण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर कुळगाव-बदलापूर नगरपालिका प्रशासनाने पालिका संचालित रुग्णालयांमध्ये कार्यरत असलेल्या आरोग्य सेवकांची सेवा तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये अनेक डॉक्टर, परिचारिका, मदतनीस आणि आरोग्य सेवकांचा समावेश आहे. ३१ मे रोजी या कर्मचाऱ्यांची सेवा खंडित करण्यात आली आहे.

गौरी सभागृहातील अतिदक्षता विभाग सांभाळणाऱ्या संस्थेला पुन्हा काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात संबंधित संस्थेने काम बंद केल्याने अतिदक्षता विभाग बंद करावा लागला होता.

रुग्णसंख्या घटल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या कपात करण्याचा निर्णय घेतला. मात्र रुग्णसंख्या वाढल्यानंतर आरोग्य कर्मचारी नेमले जातील. अनेक डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य सेवकांच्या मुलाखती पूर्ण केलेल्या आहेत. ज्यावेळी त्यांची गरज लागेल, त्यावेळी त्यांना बोलावले जाईल. -दीपक पुजारी, मुख्याधिकारी, कुळगाव-बदलापूर नगरपालिका.