बांधकाम क्षेत्रातील मंदीमुळे शुल्काच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नात घट

आर्थिक मंदीच्या वातावरणात बांधकाम क्षेत्रात आलेल्या मरगळीचा परिणाम ठाणे महापालिकेच्या उत्पन्नावरही दिसू लागला आहे. मोठय़ा प्रमाणावर निर्माण होत असलेल्या बांधकाम प्रकल्पांच्या माध्यमातून बांधकाम तसेच अन्य परवानगी शुल्कांपोटी मिळणाऱ्या उत्पन्नासाठी पालिकेने चालू आर्थिक वर्षांत ९२४ कोटींचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, गेल्या आठ महिन्यांत पालिकेच्या शहर विकास विभागाला ४९३ कोटी रुपये वसूल करणेच शक्य झाले आहे. बांधकाम क्षेत्रातील मंदीच्या वातावरणामुळे यंदा गतवर्षीइतकी वसुली करणेही कठीण जाईल, असे पालिकेतील अधिकाऱ्यांचे मत आहे.

गेल्या काही वर्षांपासून बांधकाम उद्योगावर मंदीचे सावट असले तरी ठाणे तसेच आसपासच्या परिसरात मोठय़ा प्रमाणावर प्रकल्प उभारणीची कामे सुरू होती. मुंबई महानगर क्षेत्रात घोडबंदर परिसराला गेल्या काही काळात मोठे महत्त्व प्राप्त झाले असून हजारो कोटी रुपयांचे बांधकाम प्रकल्प या भागात सुरू आहेत. त्यामुळे ठाणे महापालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात शहर विकास विभागाला विविध बांधकाम शुल्कांच्या माध्यमातून ९२४ कोटी रुपयांच्या उत्पन्न वसुलीचे आव्हानात्मक उद्दिष्ट दिले होते. गेल्या आठ महिन्यांत या विभागाला ४९३ कोटी रुपयांची वसुली करण्यात यश आले असून पुढील चार महिन्यांत अपेक्षित उद्दिष्ट कसे गाठायचे, या विवंचनेत या विभागातील अधिकारी दिसू लागले आहेत. शहरातील बडय़ा गृहप्रकल्पांमुळे वसुलीचा हा आकडा गाठता आला असला तरी आर्थिक मंदीमुळे शहरात उभे राहिलेल्या गृहप्रकल्पातील घरांच्या विक्रीला काहीसा लगाम बसला आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत नवीन गृह प्रकल्प राबविण्यासाठी विकासकांनी हात आखडता घेतल्याने शहर विकास विभाग उत्पन्न वसुलीच्या उद्दिष्ट पार करणे आव्हानात्मक ठरेल, अशी कबुली शहर विकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

उत्पन्न वसुलीचे आव्हान

ठाणे महापालिकेच्या आर्थिक विकासाचा पाया विविध विभागांच्या उत्पन्न वसुलीवर अवलंबून असतो. आयुक्त संजीव जयस्वाल यांनी उत्पन्न वसुलीवर भर देऊन महापालिकेची आर्थिक परिस्थिती मजबूत केली. २०१४-१५ या आर्थिक वर्षांत १६०६ कोटी रुपयांच्या उत्पन्न वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यानंतर गेल्या चार वर्षांत उत्पन्न वसुलीत १०३ टक्क्य़ांनी वाढ झाल्याने २०१८-१९ मध्ये ३२६५.६८ कोटी रुपयांच्या उत्पन्न वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. तर २०१९-२० या अर्थसंकल्पामध्ये ३८६१.८८ कोटींचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले असून त्या शहर विकास विभागाला विविध शुल्कांच्या माध्यमातून ९२४ कोटी रुपयांच्या उत्पन्न वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. गेल्यावर्षी शहर विकास विभागाने ७२२ कोटी रुपयांचे उद्दिष्टापैकी ६५० कोटी रुपयांची वसुली केली होती.

इतर प्रकल्पांवर मंदीचे मळभ

ठाणे महापालिका शहर विकास विभागाकडून विविध प्रकारचे शुल्क वसूल करण्यात येते. त्यामध्ये बांधकाम शुल्क, चटईक्षेत्र भू-निर्देशांक प्रीमियम, कामगार कल्याण कर आणि मालमत्ता कर अशा शुल्कांचा समावेश असतो. गेल्यावर्षी या विभागाला ६५० कोटी रुपयांच्या उत्पन्न वसुलीचा आकडा गाठणे शक्य झाले होते. तर यंदा आर्थिक मंदीमुळे घरांच्या विक्रीला काहीसा लगाम बसला आहे. त्यामुळे विकासकांनी नवीन प्रकल्पांसाठी हात आखडता घेतला आहे. त्यामुळे शहर विकास विभागाकडे यंदा नवे प्रस्ताव दाखल होण्याच्या संख्येत मोठी घट झाली आहे.