इमारत मोडकळीस, अपुरे कर्मचारी, साधनसामग्रींची कमतरता; वर्षांला १८० कोटींचा महसूल मिळूनही दुरवस्था

दरवर्षी १८० कोटी रुपयांचे महसुली उत्पन्न मिळवून देणारे वसईचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) सर्वसामान्य जनतेला मात्र साधनसुविधांपासून वंचित ठेवत आहे. आरटीओ कार्यालय जिथे आहे, ती इमारत मोडकळीस आली आहे. या कार्यालयात दूरध्वनी आणि इंटरनेटची सुविधाही नाही. अपुरे मनुष्यबळ असल्याने नागरिकांना अत्यंत गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. आरटीओ कार्यालयाच्या या दुरवस्थेमुळे नागरिकांना परवाने, नूतनीकरण अशा किरकोळ कामांसाठीही वारंवार चकरा माराव्या लागत आहेत.

पालघर जिल्हा अस्तित्वात येण्यापूर्वी ठाण्यात प्रादेशिक परिवहन कार्यालय होते. २०११ पासून विरार पूर्वेच्या चंदनसार येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात आले. वसईसह पालघर जिल्ह्य़ातील आठ तालुक्यांचा कारभार या केंद्रातून चालवला जातो. मात्र या कार्यालयात अपुरे मनुष्यबळ, अपुऱ्या साधनसामग्रींची समस्या भेडसावत आहे.

हे कार्यालय तात्पुरत्या स्वरूपात बांधले होते. चार वर्षे लोटूनही हे कार्यालय त्याच अवस्थेत आहे. वाहन नोंदणी, अनुज्ञप्ती (परवाना) आदी कामांसाठी नागरिक येत असतात, परंतु नागरिकांना कार्यालयात थांबण्याकरिता सोयीची जागा उपलब्ध नाही. उन्हात आणि पावसाळ्यातही नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागते. येथे स्वच्छतागृहाचीही सोय नाही. कार्यालयाच्या भितींना तडे गेले आहेत. कागदपत्रे ठेवण्यासाठी जागा नसल्याने ती अस्ताव्यस्त पडलेली दिसून येतात.

अपुऱ्या कर्मचाऱ्यांचा फटका

या ठिकाणी आरटीओ कार्यालय स्थापन झाले, तेव्हापासून तिथे कमी कर्मचारी आहेत. आजही मंजूर पदांपैकी केवळ १५ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात एक प्रादेशिक परिवहन अधिकारी, १ साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, ७ मोटार वाहतूक निरीक्षक, ५ साहाय्यक मोटार वाहतूक निरीक्षक आणि उर्वरित लिपिक यांचा समावेश आहे. या कार्यालयात दररोज ५०० हून अधिक नागरिक वाहन नोंदणी, परवाना, नूतनीकरण आदी कामांसाठी येतात. त्यामुळे त्यांना ताटकळत राहावे लागते किंवा सतत फेऱ्या माराव्या लागतात.

साधा दूरध्वनीही नाही

या कार्यालयात साधा लॅण्डलाइन दूरध्वनी व्यवस्थाही नाही. त्यामुळे कर्चमारी स्वत:चा मोबाइल वापरतात. इंटरनेट नसल्याने संगणकीकृत कामे होत नाहीत. सध्या कॅशलेस व्यवस्था राबवण्यासाठी प्रयत्न होत आहेत, मात्र येथे इंटरनेटची व्यवस्था नसल्याने कॅशलेस राबवणे कठीण आहे.

आमच्याकडे अपुरा कर्मचारी वर्ग असला तरी आम्ही दिवस-रात्र काम करून नागरिकांची कामे करून देत असतो. आमच्याकडील कर्मचारी सुटीच्या दिवशीही तसेच दररोज दहा तासांहून अधिक काम करतात. या कार्यालयात असलेल्या गैरसोयींबाबत वरिष्ठांना वेळोवेळी कळवले असून या अडचणी लवकरच दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल.

अभय देशपांडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वसई