22 April 2019

News Flash

कल्याण रेल्वे स्थानकातील निराधार महिलेचे पुनर्वसन

ताराबाई राठोड या कल्याण स्थानकात आपली मुलगी आणि नातवंडांसोबत राहत होत्या.

नोकरी मिळाल्यानंतर ताराबाई राठोड यांनी नातवंडांसोबत आनंद व्यक्त केला.

‘अनुबंध’च्या प्रयत्नांतून अग्रवाल महाविद्यालयात नोकरी
एकीकडे महाविद्यालयात उच्चशिक्षण घेत असतानाच अनुबंध या संस्थेच्या माध्यमातून परिसरातील वंचित घटकांसाठी सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या तरुणाईच्या संवेदनशीलतेमुळे कल्याण रेल्वे स्थानकातील एका निराधार महिलेला रोजगार मिळाला आहे. अग्रवाल महाविद्यालयात या महिलेस सफाई कामगार म्हणून नोकरी मिळाली असून त्यामुळे तिची मुलगी आणि नातवंडांचा चरितार्थाचा प्रश्न सुटला आहे.
ताराबाई राठोड या कल्याण स्थानकात आपली मुलगी आणि नातवंडांसोबत राहत होत्या. रेल्वे स्थानक आणि क्षेपणभूमी परिसरातील लहान मुलांसाठी काम करणाऱ्या ‘अनुबंध’ संस्थेतील कार्यकर्त्यांच्या नजरेस हे कुटुंब पडले. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करून या कुटुंबाला राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. मात्र कोणताही रोजगार हातात नसताना कुटुंब चालवायचे कसे, हा प्रश्न या महिलेसमोर होता. त्यांची ही गरज ओळखून कार्यकर्त्यांनी कल्याणमधील के.एम अग्रवाल महाविद्यालयात ताराबाईंना सफाई कामगार म्हणून रुजू करून घेतले. सध्या त्या अग्रवाल महाविद्यालयात सफाई कामगार म्हणून कार्यरत असून कुटुंबाचा आधार बनल्या आहेत.
सामाजिक कार्यास वाहून घेतलेल्या ‘अनुबंध’ संस्थेची स्थापना २००५मध्ये झाली. रेल्वे स्थानक परिसरात जाऊन संस्थेचे कार्यकर्ते स्थानकामध्ये राहणाऱ्या मुलांशी मैत्री करतात आणि त्याच ठिकाणी मुलांसाठी शिक्षणाचे वर्ग सुरू होतात. सध्या संस्थेतर्फे रेल्वे स्थानक परिसर आणि कल्याण क्षेपणभूमी परिसरातील साठेनगर वस्तीत मुलांसाठी पूरक शैक्षणिक वर्ग भरवले जातात. तसेच रेल्वे स्थानकात राहणाऱ्या मुलांना भाडय़ाने जागा घेऊन पर्यायी घर उपलब्ध करून देण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. संस्थेने शिक्षित केलेली रेल्वे स्थानकातील अनेक मुले दहावी उत्तीर्ण होऊन महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत.

संस्थेतच शिकलेली काही मुले या कार्यात हातभार लावत आहेत. सामान्य मुलांसारखेच या मुलांमध्येही कला कौशल्य आहे. फक्त त्यांना मार्ग दाखवण्याची गरज आहे. यासाठी एका कुटुंबाचे पुनर्वसन करून थांबणार नाही तर अशा अनेक निराधार कुटुंबांचे पुनर्वसन करण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.
– प्रा. मीनल सोहोनी, ‘अनुबंध’ संस्था

First Published on November 20, 2015 1:24 am

Web Title: rehabilitation of helpless woman of kalyan railway station