आशीष धनगर

राज्य सरकारने प्लास्टिक बंदी जाहीर केल्यानंतरही थर्माकोलचे मखर बनवण्याचा अट्टहास कायम ठेवणाऱ्या उल्हासनगरमधील मखर कारागीर आणि व्यावसायिकांनी आता पर्यावरणाचा वसा घेतला आहे. यंदाच्या गणेशोत्सवासाठी या बाजारात मखरनिर्मिती जोरात सुरू असली तरी, मखर घडवण्यासाठी पुठ्ठा, लाकूड, कापड आणि कागद यांचाच वापर केला जात आहे.

ठाणे जिल्ह्य़ातील उल्हासनगर शहर हे मोठे व्यापारी केंद्र आहे. गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी लागणारे मखर उल्हासनगर शहरात घाऊक प्रमाणात तयार केले जाते. गणेशोत्सवाच्या अगोदर काही महिन्यांपूर्वीच उल्हासनगर शहरात हे काम सुरू होते. विविध प्रकारच्या थर्माकोलपासून आणि प्लास्टिक साहित्यापासून तयार करण्यात आलेली मखरांची मोठी निर्मिती येथे लघुउत्पादक केंद्रांमधून होत असे. गेल्या वर्षी राज्य सरकारने प्लास्टिक आणि थर्माकोलवर बंदी घालणाचा निर्णय घेतला. त्यामुळे उल्हासनगर येथील मखर कारागीरांना प्लास्टिक आणि थर्माकोलपासून मखर तयार करण्याचे काम थांबवावे लागले होते. त्यानंतरही काही कारागीर थर्माकॉलचा वापर करताना आढळले होते. अशांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्यामुळे अनेकांना मोठे नुकसान सोसावे लागले होते.

गेल्यावर्षीचा अनुभव पाहून यंदा अनेक कारगीरांनी पर्यावरणपूरक मखरांच्या निर्मितीकडे लक्ष केंद्रित केले आहे. गणेशोत्सवाच्या काळात केवळ सामाजिक संस्थांकडूनच पर्यावरणपूरक मखर बनवण्याच्या कार्याशाळांचे तसेच विक्रींचे आयोजन केले जायचे. यावर्षी मखरांचे मुख्य बाजार असणाऱ्या उल्हासनगरातील अनेक लहान-मोठे लघुउद्योजक कारागीरांकडून पुठ्ठा, लाकूड, कापड, लोखंडी पट्टय़ा आणि विविध प्रकारचे कागद असे विघटन होणार साहित्य वापरून आकर्षक मखर तयार करत आहेत. या मखरांची किंमत एक हजारापासून सुरू होत असून आकारानुसार विक्री किंमत आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचाही पुढाकार

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा सजत असताना महाविद्यालयीन तरुणाईदेखील गणेशोत्सवात पर्यावरणपूरक मखर बनवण्यासाठी पुढे सरसावले आहेत. ठाण्यातील वक्रतुंड आर्ट्सच्या माध्यमातून सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स महाविद्यालयाचे विद्यार्थी लाकूड, प्लायवूड कागद, पुठ्ठा, वेत अशा विघटन होणाऱ्या वस्तूंचा वापर करून पर्यावरणपूरक मखर तयार करत आहेत.

गेल्यावर्षी राज्य सरकारने प्लास्टिकवर बंदी घातल्यामुळे व्यापारांचे आणि कारागीरांचे मोठे नुकसान झाले. तसेच गणेशोत्सवाची मखर खरेदीही थंडावली होती. मात्र काळानुरूप मखर तयार करणाऱ्या उत्पादकांनी पर्यावरणपूरक मखर तयार करण्यास प्राधान्य दिले. यामुळे ग्राहक पर्यावरणपूरक मखर खरेदीकडे वळले असून मखर उद्योगात चांगली तेजी आहे.

– नीलेश कांबळे, मखर विक्रेते, उल्हासनगर