कल्याण : महिला पोलीस कर्मचाऱ्यावर बलात्कार करून फरार झालेल्या नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील उपनिरीक्षक अमित शेलार (३५) याचा अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे विशेष न्यायदंडाधिकारी एस. पी. शिरसाट यांनी फेटाळला. अतिशय गंभीर गुन्हा आरोपीने केला असल्याने तो जामिनास पात्र नाही, असे मत नोंदवून शिरसाट यांनी शेलारचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

आरोपीकडून अज्ञानाने हा प्रकार घडला असल्याचे आरोपीच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले. विशेष सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी ‘आरोपी शेलारने गंभीर गुन्हा केला आहे. तो तपासाला सहकार्य करीत नाही,’ असे सांगत अटकपूर्व जामीन देण्यास विरोध केला. पीडित महिला पोलीस आणि आरोपी शेलार आठ वर्षांपूर्वी नवी मुंबईतील पोलीस ठाण्यात एकत्र कार्यरत होते. दीड वर्षांपूर्वी त्यांची एका कार्यक्रमात भेट झाली. त्यानंतर शेलार शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न करू लागला. गुंगीचे औषध देऊन तिची अश्लील चित्रफीत तयार केली. ती प्रसारित करण्याची धमकी देऊ लागला. प्रतिसाद न दिल्याने पीडितेचा जातीवाचक उल्लेख करून अपमान करू लागला. दीड वर्षांत अनेक वेळा जबरदस्तीने शेलारने पीडितेवर बलात्कार केला. पीडित महिलेने पतीला सगळा प्रकार सांगितला. महिला अत्याचार प्रतिबंधक विभागात तक्रार केली. त्यानंतर नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी या गुन्ह्याचा पाठपुरावा करून आयुक्तालयातील एका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.