मत्स्यव्यवसाय खात्याचे आवाहन, जाळ्याच्या नुकसानीपोटी २५ हजारांचे अनुदान

मिल्टन सौदिया, लोकसत्ता

वसई : ससून डॉक येथे देवमाशाची विक्री करणाऱ्यांवर वन विभागाने फौजदारी कारवाईचा बडगा उगारल्यानंतर आता मच्छीमारांमध्ये चलबिचल निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे, ‘जाळे फाडा, पण वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत संरक्षित सागरी प्रजातींना समुद्रात सोडा’, असे आवाहन मत्सव्यवसाय खात्याने केले आहे. जाळ्याच्या नुकसानीपोटी २५ हजार रुपयांचे अनुदान दिले जाईल, असेही खात्याकडून सांगण्यात आले आहे.

गेल्या आठवडय़ात मुंबईच्या ससून डॉक येथे व्हेल शार्क माशाची (देवमासा) विक्री करण्यात आली. समुद्रात मासेमारी करताना बऱ्याच वेळा कासव, डॉल्फिन, शार्क आणि इतर दुर्मीळ मत्स्यप्रजाती मच्छीमारांच्या जाळ्यात अडकतात. त्यांना वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत संरक्षित करण्यात आले आहे. हे जाळे तातडीने कापले तरच संबंधित प्रजाती वाचू शकतात. त्यांना सोडविण्यासाठी मच्छीमारसुद्धा प्रयत्न करतात; परंतु असे करताना मच्छीमारांच्या जाळ्याचे नुकसान होते. त्यामुळे काही वेळेस मच्छीमार अशा प्रजाती पुन्हा समुद्रात सोडण्याचा प्रयत्न करीत नाहीत. समुद्रातील दुर्मीळ प्रजातींचे संरक्षण व्हावे आणि त्यांची सुटका करताना मासेमारी जाळे फाटल्याने किंवा कापल्याने मच्छीमार बांधवांचे होणारे नुकसानही टाळता यावे यासाठी अशा घटना झाल्यास २५ हजार रुपयांचे अनुदानदेण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. याबाबत अधिक माहिती देताना पालघर जिल्ह्यचे साहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त अजिंक्य पाटील म्हणाले की, ‘हे अनुदान मुख्य वन संरक्षक, कांदळवन विभाग यांच्या कांदळवन कक्षामार्फत विशिष्ट अटी आणि शर्तीच्या अधीन राहून देण्यात येते.

जिल्हानिहाय भरपाईचे ६५ प्रस्ताव

शाश्वत मासेमारीसाठी दुर्मीळ मत्स्यप्रजातींच्या संवर्धनासाठी मच्छीमारांना नुकसान भरपाईची योजना डिसेंबर २०१८ पासून सुरू झाली. त्यानुसार राज्य वन विभागाचा कांदळवन कक्ष आणि मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहकार्याने महाराष्ट्रातील विविध किनारपट्टीवरील मच्छीमारांच्या जनजागृतीसाठी जून आणि जुलै २०१९ मध्ये कार्यशाळा घेण्यात आल्या. तेव्हापासून पालघर (१०), मुंबई (१),  रत्नागिरी (२), सिंधुदुर्ग (१६), ठाणे (२३), रायगड (१३) असे जिल्हानिहाय नुकसानभरपाईचे ६५ प्रस्ताव आले. त्यापैकी ६२ प्रकरणांमध्ये १२ लाख ६३ हजार ७५० रुपयांची भरपाई देण्यात आली असून उर्वरित तीन प्रकरणांची शहानिशा सुरू आहे.  गेल्या काही महिन्यांत दाखल झालेल्या प्रकरणांमध्ये २८ ऑलिव रिडले कासव, १६ ग्रीन सी कासव, १७ व्हेल शार्क (देवमासा), १ हॉक्सबिल कासव, १ इंडियन ओशियन हम्पबॅक डॉल्फिन, १ लेदर बॅक समुद्री कासव व १ जायंट गिराटफिश या प्रजातींना जीवनदान मिळाले आहे., अशी माहिती राज्य वन विभागाच्या कांदळवन कक्षातील अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांनी दिली.

“व्हेल शार्क, बहिरी मासा, देवमासा, रांजा, मोठे पाकट, कासव, मोठी मुशी, समुद्री घोडा हे मासे जाळ्यात पकडणे, त्याची खरेदी—विक्री आणि वाहतूक करणे हा वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा आहे. संरक्षित माशांची सुटका करताना जाळ्याचे नुकसान झाल्यास मच्छीमारांना भरपाई दिली जाते. 

  — बर्नड् डिमेलो, कार्याध्यक्ष,  मच्छीमार कृती समिती