शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण

निखिल अहिरे
ठाणे : गणेशोत्सवाच्या तोंडावर बुधवार आणि गुरुवारी झेंडूच्या फुलांच्या अनेक गाडय़ा कल्याण बाजारात दाखल झाल्या आणि ताज्या फुलांची  ५० ते ७० रुपयांनी विक्री होत असल्याने शेतक ऱ्यांनी तसेच व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

पावसामुळे फुले ओली झाल्याने कवडीमोल भावात व्यापाऱ्यांना विक्री करावी लागली होती. शेतकऱ्यांनादेखील योग्य तो भाव मिळाला नसल्याने त्यांनी विक्रीसाठी आणलेली फुले कचऱ्यात टाकून परतीची वाट धरली होती. ऐन सणासुदीच्या तोंडावर फूल व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांनादेखील मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला होता. आठ दिवसांपूर्वी फक्त पाच ते दहा रुपये किलोने फुलांची विक्री झाली होती.

जिल्ह्य़ात फुलांची मोठी घाऊक बाजारपेठ म्हणून कल्याण फूल बाजार ओळखला जातो. ठाण्यासह आसपासच्या शहरांमधून अनेक लहान फूलविक्रेते येथून फुलांची उचल करत असतात. यामुळे या बाजारात खरेदीसाठी कायम वर्दळ दिसून येते. कल्याण फूल बाजारात झेंडूच्या फुलांचा मोठय़ा प्रमाणात व्यापार केला जातो. मखमली, गेंदा, डबल गेंदा, दुरंगी झेंडू, पांढरा झेंडू या प्रकाराच्या झेंडूना सणासुदीच्या काळात चांगली मागणी असते. मागील अनेक महिन्यांपासून करोनामुळे फुलांची विक्री मंदावल्याने बाजार कोसळण्याचे सत्र सुरूच आहे.  मंदीचे सावट, मुसळधार पावसाचा फटका यामुळे फूल व्यापारी चांगलेच हतबल झाले होते.  गणेशोत्सवात हार, तोरण, सजावट, गुलदस्ते, माळा यांमध्ये प्रामुख्याने झेंडूच्या फुलांचा उपयोग केला जातो. यामुळे या गणेशोत्सवात झेंडूला चांगली मागणी असते. या फुलांची मागील दोन दिवसांपासून ग्राहकांकडून चांगली खरेदी होत आहे.

काही दिवसांपूर्वी सर्व प्रकारचे झेंडू केवळ ५ ते १० रुपये किलोने विकले जात होते. परंतु नव्याने दाखल झालेल्या फुलांची ग्राहकांकडून चांगली मागणी असून सध्या ५० ते ७० रुपयांनी झेंडू विकला जात आहे. यामुळे सर्व व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्याचबरोबर ग्राहकांनादेखील परवडणाऱ्या दरात चांगल्या प्रतीचा झेंडू मिळत असल्याने ग्राहकांकडूनदेखील फुलांची चांगली खरेदी होत आहे. झेंडूबरोबरच गुलाब, शेवंती, मोगरा, अष्टर या फुलांचीदेखील चांगल्या भावाने विक्री होत असल्याचे फूल व्यापाऱ्यांनी सांगितले. मागचे काही दिवस कवडीमोल भावात फुलांची विक्री करावी लागत होती. यामुळे सर्व व्यापारी आर्थिक संकटात सापडले होते. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर चांगल्या दराने विक्री होत असल्याने एक प्रकारे आम्हा फूल विक्रेत्यांना गणराय पावला असल्याच्या भावना कल्याण येथील फूल विक्रेते पंकज रायते यांनी व्यक्त केल्या.

झेंडूची १०० ते १५० गाडय़ांची आवक 

कल्याण फूल बाजारात मागील दोन दिवसांपासून झेंडूच्या १०० ते १५० गाडय़ांची आवक होत आहे. येथील फूल बाजारात प्रामुख्याने जुन्नर, आळेफाटा, सातारा, सांगली, डहाणू येथून झेंडूची फुले विक्रीसाठी येत असतात. या ठिकाणांहून येणाऱ्या झेंडूची आवकदेखील काहीशी कमी झाली होती.  सध्या ही आवक वाढली असून झेंडूची चांगल्या दराने विक्री होत असल्याने शेतकऱ्यांनादेखील काही अंशी दिलासा मिळाला आहे. बुधवार रात्रीपासूनच जिल्ह्य़ातील किरकोळ फूल विक्रेत्यांनी खरेदी करण्यास सुरुवात केली असल्याने कल्याण फूल बाजार रात्रीचादेखील गजबजून निघत आहे.