कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या बालवाडी शाळांमधील ९७ शिक्षिकांना दरमहा आठ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. या शिक्षिका निवृत्त होताना त्यांना निवृत्तीची बक्षिसी म्हणून सव्वा लाख रुपये मानधन देण्याचेही यावेळी ठरले.  
सभागृह नेते कैलास शिंदे यांनी सर्वसाधारण सभेत या शिक्षिकांचे मानधन वाढवण्याचा प्रस्ताव मांडला होता. गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रवादीचे पदाधिकारी रमेश हनुमंते या बालवाडी शिक्षिकांना मानधन वाढून मिळावे, त्यांना वेतनश्रेणी लागू करावी, पालिकेच्या आस्थापनेवर त्यांना घ्यावे म्हणून प्रयत्नशील होते. हनुमंते यांच्या पत्रव्यवहारांवरून शासनाने पालिका आयुक्तांना पत्राप्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान कैलाश शिंदे यांनी बालवाडी सेविकांचे मानधन वाढवण्याचा प्रस्ताव सभेसमोर ठेवला. या सेविकांना साडेचार हजार रुपये मानधन दिले जाते. ते महागाईच्या काळात तुटपुंजे आहे, असे सांगितले.

महापौरांचे प्रशासनाला आदेश
बालवाडी शिक्षिकेंबद्दल बोलताना विरोधी पक्षनेते विश्वनाथ राणे यांनी सांगितले, ‘‘या महिला केवळ चार तास काम करतात. त्यांना उर्वरित काळात महापालिकेच्या काही आस्थापनांमध्ये काम करण्यास घ्या.’’ महापौर कल्याणी पाटील यांनी या सेविकांना दरमहा आठ हजार रुपये, तसेच महिला बालकल्याण विभागाने बालवाडी सेविकांना निवृत्ती बक्षीस म्हणून २५ हजाराऐवजी सव्वा लाख रुपये देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.