उद्योगधंदा परवाना शुल्कात ५० टक्क्यांची कपात; महापालिका प्रशासनाचा प्रस्ताव

पायाभूत सुविधांची दैना आणि आर्थिक मंदी यामुळे आर्थिक गणित कोलमडलेल्या उद्योगांना अल्पसा दिलासा देण्यासाठी ठाणे महापालिकेने उद्योगधंदा व्यवसाय परवाना शुल्कात ५० टक्क्यांची, तर साठा परवाना शुल्कात ४० टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. चार वर्षांपूर्वी महापालिकेने या परवान्यांच्या शुल्कात वाढ केल्यामुळे उद्योजक संघटनांनी कोकण आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानंतर कोकण आयुक्तांनी दिलेल्या सूचनेनुसार पालिकेने परवाना शुल्ककपातीचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव पालिकेच्या आगामी सर्वसाधारण सभेसमोर मांडण्यात येईल.

ठाणे महापालिकेने २० डिसेंबर २०१४ रोजी उद्योगधंदा व्यवसाय परवाना शुल्कासह अन्य परवान्यांच्या शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. त्याला ६ एप्रिल २०१५ मध्ये सर्वसाधारण सभेने मान्यता दिली होती व त्यानंतर १ ऑक्टोबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. त्यास कोपरी फायर वर्क्‍स असोसिएशन, कोपरी फटाका मार्केट, औद्योगिक संघटना, ठाणे लघु उद्योग संघटना (टिसा) आणि पोखरण लोक स्मॉल स्केल औद्योगिक संघटना (प्लेसा) या संघटनांनी कडाडून विरोध केला होता. या शुल्कवाढीविरोधात जिल्हाधिकारी आणि कोकण आयुक्ता, विभागीय समन्वय समिती या सर्वाकडे तक्रार केली होती.

याप्रकरणी जिल्हाधिकारी आणि कोकण आयुक्ता, विभागीय समन्वय समिती यांनी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना वैयक्तिक लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आयुक्त जयस्वाल यांनी या प्रकरणात लक्ष घालून उद्योगधंदा व्यवसाय परवाना शुल्कात ५० टक्के, तर साठा परवाना शुल्कात ४० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, परवानाअंतर्गत येणाऱ्या काही बाबींमध्ये बदल करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव येत्या मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला आहे.

ठाणे शहरातील वागळे इस्टेट आणि पोखरण परिसरात औद्योगिक वसाहती असून येथील उद्योजकांना रस्त्यावरील खड्डे, अनियमित पाण्याचा पुरवठा, स्वच्छतागृह अशा समस्यांचा सामना करावा लागतो आहे. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून उद्योजकांना आर्थिक मंदीचा फटका बसत आहे. असे असताना आता परवाना शुल्कांत कपात झाल्यास उद्योजकांना दिलासा मिळेल.

प्रस्ताव काय?

उद्योगधंदा आणि साठा परवानामध्ये व्यवसायाचे नाव बदल करणे किंवा कमी करणे. मालकाचे नाव बदल करणे, भागीदाराच्या नावात बदल करणे किंवा वाढ करणे, परवाना व्यवसायाच्या स्वरूपात बदल करणे, साठा परवाना क्षेत्रफळ बदल करणे, साठा परवाना कर्मचारी संख्येत बदल करणे, साठा परवाना दुय्यम प्रत अदा करणे किंवा इतर बाबी अशा सर्व बाबी परवानाअंतर्गत येतात.

या बाबींच्या दुरुस्तीसाठी परवाना मुदत संपण्यापूर्वी मागणी केली तर त्यासाठी परवाना वार्षिक शुल्काची २० टक्के रक्कम भरावी लागत होती. मात्र, या दुरुस्तीसाठी २० टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त पाच हजार रुपये आकारण्याची शिफारस प्रस्तावात करण्यात आली आहे.