बदलापूर: गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा अखेर संपला असून राज्य शासनाकडून ठाणे जिल्ह्याला शुक्रवारी पहिल्या टप्प्यात पाच हजार १७ रेमडेसिविरच्या कुप्यांचा साठा प्राप्त झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षामार्फत या कुप्यांचे मागणीनुसार वितरण केले जाणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात आणि ठाणे जिल्ह्यात निर्माण झालेल्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. करोना रुग्णांसाठी दिलासादायक ठरणाऱ्या या रेमडेसिविर इंजेक्शनची एक कुपी मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना शहरे पालथी घालावी लागत होती. अखेर शुक्रवारी चार दिवसांनंतर राज्य शासनाकडून जिल्हा प्रशासनाला पहिल्या टप्प्यात रेम़डेसिविर इंजेक्शनच्या ५ हजार १७ कुप्या उपलब्ध झाल्या आहेत. नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली असून आता मागणीनुसार जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी कोविड रुग्णालयांना पुरवठा केला जाणार आहे.