पालिकेच्या कोविड रुग्णालयातच लशीचे पैसे भरण्याची सुविधा

ठाणे : करोना रुग्णांवर उपचारासाठी उपयुक्त ठरणारे रेमडिसेवीर इंजेक्शन आणि त्यासाठीचे पैसे भरण्याची सुविधा साकेतमधील कोविड रुग्णालयातच उपलब्ध करून देण्याची सुविधा महापालिकेने मंगळवारपासून सुरू केली. यामुळे नागरिकांना आता इंजेक्शनचे पैसे भरण्यासाठी माजिवाडा-मानपाडा प्रभाग समितीमध्ये जावे लागणार नाही.

करोना रुग्णांवर उपचारासाठी उपयुक्त ठरणारे रेमेडीसीविर इंजेक्शनचा साठा ठाणे महापालिकेने खरेदी केला आहे. महापालिकेच्या साकेत भागातील कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना हे इंजेक्शन विनामूल्य देण्यात येते. शहरातील खासगी कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना तेथील डॉक्टरांच्या चिठ्ठीनुसार हे इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात येते. परंतु त्यासाठी त्या रुग्णाच्या नातेवाईकांना पैसे भरावे लागतात. इंजेक्शन आणि त्यासाठीचे पैसे भरण्यासाठी रुग्णालयात एकत्रित सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांना माजिवाडा-मानपाडा प्रभाग समितीत इंजेक्शनचे पैसे भरण्यासाठी जावे लागत होते. त्यानंतर इंजेक्शन घेण्यासाठी रुग्णालयात जावे लागत होते.

प्रशासनाकडून अंमलबजावणी

रेमडीसेवीर इंजेक्शनसाठी द्राविडी प्राणायाम करावा लागत असल्याने नौपाडय़ातील रहिवाशी अमोल फडके यांनी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे हा प्रकार कळविला होता. याप्रकरणी महापौरांनी तातडीने लक्ष देत ही उणीव दूर करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. त्यानुसार कोविड रुग्णालयातच इंजेक्शन आणि त्यासाठीचे पैसे भरण्याची सुविधा सुरू करण्याचे आदेश आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिले आहेत.