तुमच्या पाठीशी किती जण आहेत यापेक्षा तुम्ही किती जणांच्या पाठीशी आहात यावरून तुमचं मोठेपण समजतं. दिवंगत काका नाईक यांच्या अंत्ययात्रेला (२३ डिसेंबर १९९७) जमलेल्या दहा हजारांच्या समुदायाने त्यांच्या हृदयातील काकांचं स्थान असं न बोलताच प्रकट केलं. २ ऑक्टोबर २०१५ हा काका नाईक यांच्या जन्मशताब्दीचा दिवस. या निमित्ताने तत्कालीन विविध मान्यवर संस्थांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या या प्रामाणिक व दिलदार ठाणेकराच्या आठवणींना उजाळा..

एखादी व्यक्ती आपल्या परिसरातील नागरिकांसाठी किती विश्वासार्ह असू शकते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे काका नाईक. ठाणे शहरातील अनेक संस्थांमध्ये अध्यक्ष, विश्वस्त अशा पदांची जबाबदारी योग्यपणे सांभाळून काकांनी आयुष्यभर जनतेचा विश्वास सार्थ ठरवला. काकांचं पूर्ण नाव कृष्णराव दादाजी नाईक. ते पाच वर्षांचे असतानाच त्यांचे वडील वारले, परंतु त्यांच्या चुलत्यांनी या पुतण्याचं मुलाप्रमाणे संगोपन केलं. त्यांच्याच इच्छेमुळे काका पुढे वकील झाले. हा वकील कायम सत्याची कास धरणारा असल्यामुळे त्यांच्या संपर्कातील प्रत्येकाला हा घरचा वकील वाटे. वामनराव ओक, माधवराव हेगडे व काका नाईक या कर्तृत्वशाली त्रिकुटाचं अगदी मेतकूट होते. वामनराव ओक तर काकांना गुरुस्थानी होते. वामनरावांचाही त्यांच्यावर एवढा विश्वास की कुठल्याही संस्थेसाठी विश्वस्त म्हणून नाव सुचवा म्हटलं की ते आपल्या या सच्च्या दोस्ताचं नाव पुढे करीत.

गावदेवी हे ठाण्याचे ग्रामदैवत. नवरात्रात देवीची ओटी भरण्यासाठी स्त्रिया इथे पहाटेपासून रांगा लावतात. पण पूर्वी हे मंदिर अंधारलेलं असायचं आणि गाभाराही चिंचोळा होता. त्यामुळे महिलांना येथे सुरक्षित वाटत नव्हतं. १९६०-६९ या काळात काका नाईक या मंदिराचे विश्वस्त झाले, तेव्हा त्यांनी ही परिस्थिती बदलली. दोन्ही नवरात्रात नवचंडीचे होम सुरू केले. स्टेशन रोडवरील ब्राह्मण सभेसमोरच्या विठ्ठल मंदिराचेही काका विश्वस्त होते.

ठाण्यातील पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे ते पूर्ण ४५ वर्षे विश्वस्त होते. या संस्थेच्या अधिपत्याखाली न्यू इंग्लिश स्कूल, न्यू गर्ल्स स्कूल, नौपाडा मिडल स्कूल, भारत नाईक हायस्कूल, मराठी माध्यमाची प्राथमिक शाळा व ठाणे पूर्व येथील ज्युनिअर के.जी. ते बारावीपर्यंतची शाळा अशा सहा शाळा येतात. या संस्थेचे भूतपूर्व सचिव जयंत ओक यांना काका नाईकांचा २२/२३ वर्षांचा सहवास लाभला. ते म्हणतात, ‘‘आमच्या संस्थेची स्थावर मालमत्ता वाढवण्यासाठी ते कायम प्रयत्नशील होते. त्यांच्या कारकीर्दीत संस्थेने पनवेलजवळील रसायनी येथे दोन एकर जागा खरेदी केली. त्या वेळी सर्व कायदेशीर बाजू पडताळण्याची जबाबदारी त्यांची होती. त्यानंतर या जागेत सावली देणारी झाडं लावण्यातही त्यांनी पुढाकार घेतला. काकांच्या कृपेने आज या ठिकाणी १०० ते १२५ मुलांचं निवासी शिबीर घेण्यासाठी सर्व सोयी उपलब्ध आहेत. तसंच न्यू इंग्लिश स्कूलची आडवी इमारतदेखील त्यांच्याच कारकीर्दीत बांधली गेली.’’

ठाणे पीपल्स को-ऑप. बँकेचे ते १९५३ ते १९७७ या कालावधीत अध्यक्ष होते. या काळात बँक प्रगतिपथावर होती. परंतु जेव्हा कर्जवाटपात भ्रष्टाचार सुरू झाला तेव्हा त्यांनी स्वत:हून अध्यक्षपदाची सूत्रे खाली ठेवली. त्यानंतर बँकेचं काय झालं ते सर्वानाच माहीत आहे. काका ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाचेही ३० वर्षे विश्वस्त होते. ते ज्या ज्या संस्थांमध्ये पदाधिकारी होते तिथे नेहमी सामंजस्याचं वातावरण राहिलं. प्रश्न सामोपचाराने सुटतील याची त्यांनी कायम खबरदारी घेतली.

जिवाला जीव देणं हा त्यांचा एक गुणविशेष. शंकर लिंगायत या गृहस्थांचं ठाणे स्टेशनजवळ एक पोळीभाजी केंद्र होतं. काही कारणाने हा शंकर लिंगायत गजाआड गेला, परंतु त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल काकांना खात्री असल्याने लोक काय म्हणतील याचा विचार न करता शंकर परत येईपर्यंत त्यांनी त्याचा गल्ला सांभाळला. त्यांचे बरेचसे पक्षकार पारशी व ख्रिश्चन होते. जेसावाला हा त्यापैकी एक. आपल्या शौकांपायी हा लक्ष्मीपुत्र पुढे कर्जबाजारी झाला तरी काकांना धरून होता. त्याच्या पडत्या काळात घरातली अडचण सोसून काकांनी त्याची अनेकदा नड भागवली. त्यानेही हे उपकार स्मरून मृत्यूसमयी आपली भांडुपची ५/६ एकर जमीन काकांच्या नावावर केली. वकील आणि अशील यांच्यातील असं नातं आता स्वप्नातदेखील दिसणं कठीण आहे. अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली. डॉ. बेडेकरांच्या रुग्णालयाला महापालिकेकडून पाणी मिळण्यात अडचण येत होती. तेव्हा काकांनी त्यासाठी आपल्या विहिरीचं पाणी तिकडे वळवलं होतं.
संपदा वागळे  (waglesampada@gmail.com)