वेध विषयाचा परिषदेत रेणू गावस्कर यांचे प्रतिपादन
समाज मुलांवर अनाथ असल्याचा शिक्का लावतो हे योग्य नाही. माणसाला माणूस म्हणून जगायला देत नाही. पृथ्वीवरील शेवटचा माणूस सुखी होईपर्यंत प्रयत्न करायला हवेत. जोपर्यंत संपूर्ण समाज अपराधी असल्याची भावना बाळगत नाही, तोपर्यंत समाजातील क्रूरता, अमानुषता थांबणार नाही असे मत वंचित मुलांसाठी काम करणाऱ्या एकलव्य न्यास संस्थेच्या रेणू गावस्कर यांनी वेध परिषदेत प्रतिपादन केले.
दोघांपैकी एकाने नोकरी आणि दुसऱ्याने समाजसेवा करावी, असे ठरल्याने मी बँकेची नोकरी सोडून हे काम पत्करले. ‘संध्याकाळी घरी परत आल्यावर पतीची सेवा करण्यापेक्षा ही संध्याकाळ ज्यांच्यासाठी दुर्दैवी असते अशा मुलांसाठी काम कर,’ अशा प्रकारे घरातूनच पाठिंबा मिळाला. त्यामुळे लोक काय म्हणतील याचा विचार न करता समाजसेवेचे व्रत हाती घेतले,असे त्यांनी सांगितले. माटुंगा परिसरात पतीसोबत फेरफटका मारताना डेव्हिड ससून येथील मुलांविषयी आत्मीयता निर्माण झाली, तेव्हापासून कामाला सुरुवात केली. रिमांड होममधील मुले आणि वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी काम करताना दुसऱ्याच्या वैयक्तिक आयुष्यात त्रास होईल असे प्रश्न विचारायचे नाहीत, हे तत्त्व कायम पाळले, असे त्यांनी सांगितले.
कामानिमित्त डेव्हिड ससून येथे जात राहिल्यावर तेथील मुलांचे जगणे कळत गेले. मुलांसाठी काम करताना मर्यादांची जाणीव ठेवून घरसदृश व्यवस्था निर्माण करायला हवी या विचारांतून पुण्यात एकलव्य न्यास संस्थेची स्थापना झाली. वेश्या वस्तीत गेल्यावर तिथल्या मुलांचा अयोग्य कामांसाठी वापर होताना पाहिला. त्यामुळे ही मुले त्या ठिकाणी राहणे योग्य नाही हे लक्षात आल्यावर या मुलांसाठी काम करायचे ठरवले. संस्कार माणसाला बदलतात. ही मुले जन्मत:च म्हातारी होतात. कोवळ्या वयात मुलांवर चांगले संस्कार होणे गरजेचे असते. आयुष्याशी तडजोड करणे ही मुले आपल्याला शिकवतात, असे रेणू गावस्कर यांनी सांगितले.