महत्त्वाच्या रस्त्यांवर तसेच उड्डाणपुलांवर पडलेल्या खड्डय़ांमुळे टीकेचे धनी ठरलेल्या महापालिका प्रशासनाने बुधवारी दुपारपासून खड्डे भरण्याची मोहीम हाती घेतली. महापालिकेने केलेल्या दाव्यानुसार २४ तासांत ११२२ पैकी ८५६ खड्डे भरण्यात आले आहेत. उर्वरित ३२० खड्डे भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गणेशोत्सवाआधी कोणत्याही परिस्थितीत खड्डे भरले जावेत, अशा सूचना आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिल्या आहेत.

खड्डय़ांच्या त्रासामुळे नागरिकांनी महापालिकेच्या कारभारावर टीकाही सुरू केली होती. या पार्श्वभूमीवर महापौर नरेश म्हस्के यांनी पालिका अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढून तात्काळ खड्डे बुजवण्याचे आदेश दिले होते. तर महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनीही शहरात दौरा करून तात्काळ खड्डे भरण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने बुधवारी दुपारपासून शहरात खड्डे भरण्याची मोहीम हाती घेतली आहे. महापालिकेने तीन हात नाका, नितीन कंपनी ते लुईसवाडी सेवा रस्ता, दालमिल नाका, एम्को कंपनी, माजिवाडा नाका, तीन हात नाका उड्डाणपूल आणि कशीश पार्क याठिकाणी खड्डे बुजविले आहेत. खड्डे बुजविण्याची ही मोहीम सुरू ठेवण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

‘खड्डे भरा, अन्यथा मी येथेच थांबून राहीन’

ठाणे शहरातून जाणारा मुंबई-नाशिक महामार्ग तसेच उड्डाणपुलावर पडलेल्या खड्डभरणी कामाच्या पाहणीसाठी आयुक्त डॉ. शर्मा गेले असता त्या ठिकाणी काम सुरू झाले नसल्याचे चित्र त्यांना दिसले. ही बाब त्यांनी तातडीने पालकमंत्री एकनाथ िशदे यांच्या कानावर घातली. तसेच दोन्ही प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनी करत जोवर काम सुरू होत नाही, तोवर मी येथून जाणार नाही असा पवित्रा घेतला. पालकमंत्री शिंदे यांनीही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढल्यानंतर हे काम अखेर सुरू झाले.