धुळीचे साम्राज्य, गटारे उघडी आणि तुटलेला संरक्षक कठडा; खेळाडूंसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही

मुंब्रा परिसरातून चांगले खेळाडू तयार व्हावेत आणि त्यांना नियमित सराव करता यावा या उद्देशातून महापालिकेने कौसा भागात क्रीडा संकुल उभारले, मात्र देखभाल आणि दुरुस्तीअभावी या क्रीडा संकुलाची दुरवस्था झाल्याचे चित्र आहे. संकुलाच्या मैदानात वाढलेले गवत, स्वच्छतागृहातील तुटलेल्या फरश्या, उघडी गटारे, तुटलेला संरक्षक कठडा असे चित्र आहे. तसेच स्वच्छतागृहांमधील अस्वच्छतेबरोबरच सर्वत्र धूळदाण असल्याचे दिसून येते. या ठिकाणी अ‍ॅथलेटिक्सच्या नियमित सरावासाठी येणाऱ्या खेळाडूंसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नाही. या दुरवस्थेकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने खेळाडूंमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात महापालिकेचे दादोजी कोंडदेव क्रीडा संकुल असून या ठिकाणी शहरातील अनेक खेळाडू नियमित सरावासाठी येतात. मात्र, मुंब्य्रात अशा प्रकारची सुविधा उपलब्ध नव्हती. तसेच मुंब्रा ते दादोजी कोंडदेव क्रीडा संकुल असा दररोज सरावासाठी प्रवास करणे त्यांना वाहतुकीच्या दृष्टिकोनातून शक्य नव्हते. नेमकी ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने काही वर्षांपूर्वी कौसा भागात क्रीडा संकुल उभारले. या क्रीडा संकुलाला मौलाना अबुल कलाम आझाद यांचे नाव देण्यात आले. या क्रीडा संकुलामुळे मुंब्य्रातील खेळाडूंना चांगली सुविधा उपलब्ध होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. प्रत्यक्षात मात्र देखभाल आणि दुरुस्ती अभावामुळे या क्रीडा संकुलाची दुरवस्था झाली असून यामुळे खेळाडूंना चांगली सुविधा मिळण्याची शक्यता फोल ठरली आहे.

क्रीडा संकुलामध्ये सर्वत्र धुळीचे साम्राज्य असून स्वच्छतागृहातील फरश्या तुटलेल्या आहेत. या स्वच्छतागृहामध्ये लोखंडी पेटय़ा ठेवण्यात आल्या आहेत. स्वच्छतागृहात सर्वत्र अस्वच्छता आणि दरुगधी पसरली आहे. टेनिस कोर्टच्या मैदानात गवत मोठय़ा प्रमाणात वाढले असून या कोर्टच्या संरक्षक जाळ्यांनाही गंज चढला आहे. अ‍ॅथलेटिक्स प्रेक्षागृहाचा संरक्षक कठडा दोन ठिकाणी तुटलेला आहे. अतर्गत गटारावर झाकणे नाहीत. विद्युत आणि इंटरनेट वाहिन्या उघडय़ावर आहेत.

अशाप्रकारे क्रीडा संकुलाची दुरवस्था झाली असून त्याकडे पालिकेचे दुर्लक्ष होताना दिसून येते. याशिवाय, अ‍ॅथलेटिक्सचा नियमित सराव करण्यासाठी येणाऱ्या खेळाडूंकरिता पिण्याच्या पाण्याची सुविधाच उपलब्ध नाही. त्यामुळे खेळाडूंना बाहेरून पाणी विकत घ्यावे लागते. त्यामुळे महापालिकेच्या कारभारावर खेळाडू आणि प्रशिक्षकांकडून नाराजीचा सूर उमटत आहे.

निवडणूक कचरा तसाच..

मुंब्रा येथील कौसा भागात ३० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या क्रीडा संकुलाची दुरवस्था झाली असतानाच त्यामध्ये आता निवडणुकीच्या काळात या ठिकाणी झालेल्या कचऱ्याची भर पडली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठीचे कामकाज क्रीडा संकुलात पार पडले. या काळात कागद तसेच अन्य कचरा साचला असून तो अद्यापही उचलण्यात आलेला नाही.

धावपटूंना अडथळा

कौसा येथील क्रीडा संकुलामध्ये सकाळच्या वेळेत अ‍ॅथलेटिक्सच्या सरावासाठी अनेक खेळाडू येतात. त्याच वेळेत या ठिकाणी सकाळी फेरफटका मारण्यासाठीही अनेक जण येतात. हे नागरिक सिंथेटिक ट्रॅकवर फेरफटका मारत असल्यामुळे खेळाडूंच्या सरावात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे सकाळच्या वेळेत फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी खेळाडूंकडून होऊ लागली आहे.

मुंब्रा येथील क्रीडा संकुलाच्या स्वच्छतेचे काम पालिकेने हाती घेतले आहे. महिन्याभरापासून हे काम सुरू आहे. – संदिप माळवी, उपायुक्त, ठाणे महापालिका

क्रीडासंकुलामधील स्वच्छतागृहात अस्वच्छता पसरली आहे. धावपट्टीजवळ पिण्याच्या पाण्याचीही सोय उपलब्ध नाही. त्यामुळे सरावासाठी येणाऱ्या खेळांडूना बाहेरून पाणी विकत आणावे लागते. – निलेश पाटकर, क्रीडा प्रशिक्षक.