दुसऱ्या प्रभागातील उमेदवारास स्थानिकांचा विरोध

नगरसेवक व्हायचे म्हणून गेल्या सहा महिन्यांपासून तयारी करीत असलेल्या काही उमेदवारांच्या प्रभागात बाहेरील उमेदवार निवडणूक लढविण्यासाठी उतरल्याने स्थानिक विरोधात उपरे असा वाद सध्या सर्वच पक्षांत पेटला आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसेच्या इच्छुक उमेदवारांमध्ये हा वाद सध्या जोरात धुमसत आहे.

काही प्रस्थापित नगरसेवकांनी आपल्या प्रभागांमध्ये विकासकामे केली आहेत. या विकासकामांच्या जोरावर प्रस्थापित नगरसेवक निवडून येण्याची गणिते करून प्रचाराची तयारी करीत आहेत. या नगरसेवकांच्या प्रभागातील सर्व पक्षांमधील होतकरू, इच्छुक उमेदवार आपल्या परीने निवडणूक तयारी करू लागले आहेत. प्रत्येक प्रभागात सर्व पक्षांतील सुमारे चार ते पाच उमेदवार निवडणूक लढविण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत.

काही नगरसेवकांचे प्रभाग आरक्षण तसेच नवीन रचनेत बाद झाले आहेत. त्या प्रभागातील सर्व पक्षांमधील नगरसेवक, इच्छुक उमेदवार बाजूच्या प्रभागांमध्ये निवडणूक लढविण्यासाठी घुसखोरी करू लागले आहेत. आपण प्रभागात मागील पाच वर्षांपासून विकासकामे केली आहेत. त्यात आयत्यावेळी पक्षातील घुसखोर उमेदवारीसाठी दावा करू लागल्याने अनेक इच्छुक नाराज आहेत. काही इच्छुकांनी परक्या प्रभागात प्रचार सुरू केला आहे. बाहेरच्या प्रभागातील काही इच्छुकांनी वर्तमानपत्र, जाहिरातींद्वारे आपणास उमेदवारी मिळाल्याच्या थाटात प्रचारपत्रके वितरित करून आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. नेत्यांच्या आशीर्वादाने ही मंडळी प्रचार करीत असल्याने त्यांना धडा शिकविण्याची तयारी स्थानिक इच्छुक उमेदवारांनी केली आहे. प्रभागातील उमेदवाराला उमेदवारी मिळाली पाहिजे. त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचे, बाहेरील उमेदवार पक्षातील असला तरी त्याला दणका द्यायचा, अशी व्यूहरचना अनेक प्रभागांमध्ये आखण्यात आली आहे. डोंबिवलीतील शिवमार्केट प्रभागात स्थानिक विरुद्ध उपरे सामना मोठय़ा प्रमाणात रंगला आहे.