पूर्व द्रूतगती मार्ग नितीन कंपनीजवळील उड्डाणपूल, ठाणे (प). 

ठाणे शहर वेगाने विस्तारत आहे. त्यामुळे रस्त्यांवर वाहने आणि पादचाऱ्यांची मोठी वर्दळ असते. त्यात पुन्हा रस्त्यांचे कोपरे आणि पदपथांवर फेरीवाल्यांनी आक्रमण केले आहे. शहरात वाहनतळाचीही मोठी समस्या आहे. त्यामुळे लोक मिळेल त्या ठिकाणी वाहने उभी करून ठेवतात. उड्डाण पुलांखाली वाहने उभी करून ठेवू नयेत, असे आदेश उच्च न्यायालयानेही देऊनही अनेक जण अशा जागी वाहने ठेवतात. त्यातून घातपात होण्याची शक्यता असते. आता ठाणे महापालिकेने उड्डाण पुलांखालच्या मोकळ्या जागेचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्व द्रूतगती मार्गावरील नितीन कंपनीजवळील उड्डाण पुलाखाली तसा प्रयोग यशस्वी झाल्याचे दिसून येते. कारण या ठिकाणी परिसरातील नागरिक सकाळ-संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी येऊ लागले आहेत.

काही महिन्यांपूर्वी नितीन कंपनी ते कॅडबरी जंक्शन या सुमारे दोन किलोमीटरच्या अंतरावर शेकडो दुचाकी, कार, अवजड वाहने उभी करण्यात येत होती. तसेच या वाहनांच्या मागे अनेक गर्दुल्ले दारू किंवा अमली पदार्थ घेऊन बसत असत. त्यामुळे रात्री नऊनंतर येथून महिलांना जाताना भीती वाटत असे. शिवाय या उघडय़ा दारू अड्डय़ामुळे हा संपूर्ण परिसर बकाल झाला होता. अखेर ठाणे महापालिकेने ‘पीपीपी’ तत्त्वावर या भागाचा विकास करण्याचा निर्णय घेतला. गेल्या तीन महिन्यांपासून येथे सायकल ट्रॅक जॉगिंग ट्रॅक, लहान मुलांसाठी खेळण्याचे साहित्य, दोन्ही बाजूंनी झाडांची हिरवळ अशा सुविधा निर्माण केल्या गेल्या. त्यामुळे या परिसराचा अक्षरश: कायापालट झाला आहे. उड्डाण पुलाखालील हा परिसर सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत खुला असतो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी  विरंगुळ्यासाठी हक्काची जागा उपलब्ध झाली आहे. इथे जवळपास कुठेही उद्यान अथवा बाग नव्हती. त्यामुळे अर्थातच नागरिकांना महापालिकेकडून मिळालेली ही एक उत्तम भेट ठरली. आता सकाळी फेरफटका मारण्यासाठी इथे बरेच जण येतात. येत्या काही दिवसात या ठिकाणी आणखी काही सुविधा महापालिका प्रशासन पुरविणार आहे.

उड्डाण पुलाच्या प्रत्येक खांबावर निसर्ग संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाविषयी सुविचार आणि घोषवाक्ये लिहिलेली आहेत. सकाळी हे सकारात्मक सुविचार वाचून मन प्रसन्न होते. इथे फिरायला येणाऱ्यांच्या सोयीसाठी स्वच्छतागृहही उभारण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी इथे विविध रंगांची रोषणाई केली जाते. त्यामुळे या रंगातून हा परिसर उजळून निघतो. येथे सुमारे ७०० मीटरचा सायकल ट्रॅक उभारण्यात आला आहे. त्यामुळे शाळकरी मुले इथे सायकल चालविण्यासाठी येतात.

यापूर्वी येथे जागा उपलब्ध नसल्याने सेवा रस्त्यावरून चालावे लागत होते. त्यामुळे अनेक वेळा अपघात होण्याची शक्यता निर्माण होत होती. मात्र आता उड्डाण पुलाखालील जागेचे सुशोभीकरण झाल्याने याचा मोठा फायदा झाला. येथील जागाही मोकळी असल्याने चालायला शक्य होते, असे समीर मोरे या तरुणाने सांगितले.

गेल्या १५ दिवसांपासून माझा मुलगा जयंत आणि मी येथे येतो. हा स्पॉट सुरू झाल्यापासून परिसरातील अनेक जण चालण्यासांठी किंवा धावण्यासाठी येतात असे गोविंद तिचे यांनी सांगितले.

सुरुवातीला येथे फक्त वाहने उभी केली जात होती. त्यातील अनेक वाहने महिनोन्महिने इथे पडून असायची. त्या आडून अनेक अनैतिक उद्योग इथे चालायचे. ते आता दूर झाले आहेत. शहरातील इतर उड्डाण पुलांखालील जागांचाही असाच उपयोग केला. शहर सुशोभीकरणात भर पडेलच, शिवाय नागरिकांचीही सोय होऊ शकेल, असे राकेश जिमन यांनी सांगितले.