दिवाणखाना, शयनगृहाच्या रचनेत बदल करणे शक्य; पालिकेची स्वतंत्र परवानगी घेण्याची गरज नाही

ठाणे शहरात नव्याने उभ्या राहणाऱ्या गृहसंकुलांमधील ठोकळेबाज घरांची संकल्पना मोडीत काढण्यासाठी ठाणे महापालिकेने आखलेल्या नियमांना तब्बल चार वर्षांनी राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यानुसार बांधकाम सुरू असलेले घर खरेदी करताना ग्राहकाला घरातील दिवाणखाना, शयनगृह तसेच अन्य खोल्यांची रचना कशी असावी, हे सुचवण्याचा व त्यानुसार रचना करून घेण्याचा अधिकार मिळणार आहे. केवळ स्वयंपाकघर आणि स्नानगृह, शौचालय यांची रचना बदलता येणार नाही. मात्र, यामुळे आपल्या मनानुसार गृहरचना करण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध झाली आहे.

वास्तुविशारद आणि विकासकाच्या संकल्पनेतून साकारलेल्या इमारतीत जवळपास प्रत्येक घराची रचना सारखीच असते. बांधकामाचा वेळ व खर्चाची बचत हे यामागील महत्त्वाचे कारण असते. त्यामुळे कित्येकदा शक्य असतानाही ग्राहकांना आपल्या मनानुसार गृहरचना करता येत नाही. मूळ बांधणीला धक्का न पोहचवता घरात बदल करण्याची अनुमती मागण्यासाठी अनेक अर्ज ठाणे महापालिकेकडे येत असत. याची दखल घेत पालिकेचे तत्कालीन आयुक्त असीम गुप्ता, नगररचना विभागाचे तेव्हाचे प्रमुख जितेंद्र भोपळे आणि विद्यमान अधिकारी प्रमोद निंबाळकर यांनी विकास नियंत्रण नियमावलीत काही सुधारणा सुचविल्या होत्या. त्यानुसार घरातील किचन आणि प्रसाधानगृहाची जागा मूळ आराखडय़ानुसार ठरल्याप्रमाणे असावी, मात्र ग्राहकांनी मागणी केल्यास घराच्या उर्वरित आराखडय़ात केवळ िभतीच्या रचनेनुसार मंजुरी देण्याची तरतूद सुचवण्यात आली होती.

या सुधारणेनुसार वायुविजन आणि प्रकाशासंबंधी आखून देण्यात आलेल्या नियमांचे पालन करत मालकास त्याच्या घराची रचना करण्याचे स्वातंत्र्य मिळेल असे गृहीत धरण्यात आले होते. या बदलानुसार मालकाला मनाप्रमाणे घराची रचना करणे शक्य होणार होते. शिवाय इमारतीनुसार मूळ ढाच्यामध्ये फेरफार होऊ नये याचीही काळजी घेण्यात आली होती. घरांचा ताबा मिळाल्यानंतर रहिवासी आपल्या सोयीनुसार घरांच्या रचनेत बदल करण्याचा प्रयत्न करतात. साधारणपणे दोन खोल्यांच्या घरांमध्ये बेडरूम, हॉलचा आकार मोठा करण्याच्या प्रयत्नात स्वयंपाक खोली आणि बाथरूमची रचना बदलली जाते. त्याचा परिणाम इमारतीच्या संपूर्ण रचनेवर होतो, अशा तक्रारी यापूर्वी पुढे आल्या होत्या. तसेच काही इमारतींमध्ये न्हाणीगृहांची

जागाही बदलली जाते आणि मलवाहिनीची रचना इतर ठिकाणांहून केली जाते. घरातील अशा अंतर्गत बदलांमुळे इतर घरांमध्ये गळती लागते अशा तक्रारी वारंवार पुढे येतात. हे लक्षात घेऊन विकास नियंत्रण नियमावलीत बदल करताना ठरावीक ठोकळेबाज घरांऐवजी स्वयंपाकगृह, स्नानगृह यांचा अपवादवगळता चार भिंतींची रचना असलेल्या घरांच्या आराखडय़ास मंजुरी देण्याचा मार्ग आता शासनाने मोकळा केला आहे.

वायुविजन, प्रकाशाचे महत्त्व कायम

एखादी इमारत उभारताना नॅशनल बिल्डिंग कोडच्या नियमांची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. हे जरी खरे असले तरी ग्राहकांना त्यांच्या मनाप्रमाणे घराची रचना करणे त्यामुळे कठीण जाते. एखाद्या घरात प्रत्येक खोलीचे आकारमान किती असावे याचे काही निकष विकास नियंत्रण नियमावलीत यापूर्वीच आखण्यात आले आहेत. मात्र, खोलीची रचना कशी असावी हे ठरविण्याचे अधिकार घर मालकास मिळावे यासाठी हा बदल करण्यात आला आहे, अशी माहिती शहर विकास विभागातील सूत्रांनी दिली.