डोंबिवली शहर ते नांदिवली परिसराला जोडणाऱ्या नांदिवली पुलाचे काम संथगतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे. या पुलाच्या संथगती कारभारामुळे नागरिकांनी घरी जाण्यासाठी येथील नाल्यातून पायवाट तयार केली आहे. या पायवाटेने जाताना नागरिकांना विशेष वृद्ध व्यक्तींना व बालकांना त्रास होतो. एखाद्याचा तोल गेल्यास नाल्यात पडण्याची भीती आहे, असे नागरिकांतर्फे सांगण्यात आले.
पावसाळ्यापूर्वी नांदिवली पुलाचे काम पूर्ण होणार असल्याचा अंदाज यापूर्वी पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता.  हे काम प्रत्यक्ष सुरू झाल्यावर तेथे पाणी आणि अन्य सेवा वाहिन्या असल्याने त्यांचे स्थलांतर करण्याच्या कामामुळे पुलाचे काम लांबले. या कामासाठी अधिक वेळ गेल्याचे हे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. नांदिवली येथे जाण्यासाठी एक जुना उड्डाण पूल होता. हा पूल धोकादायक झाल्याने नवीन पुलाची मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. जुन्या पुलावरून अवजड वाहने ये-जा करीत असल्याने अपघाताची शक्यता होती. रेती, माती घेऊन जाणाऱ्या चोरटय़ा ट्रकचा हा पूल म्हणजे मोठा आधार होता.
स्थानिक नगरसेवक राजन मराठे यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करून स्थायी समितीत नांदिवली येथे नवीन उड्डाण पूल उभारण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला. त्यानंतर या पुलाचे काम सुरू करण्यात आले. या पुलावरून गांधीनगर, नांदिवली, पोस्ट व तार वसाहतीत जाणारी वाहने अन्य भागातून वळवण्यात आली आहेत. नागरिकांना वळसा घेऊन जावे लागत असल्याने लोकांमध्ये नाराजीचा सूर काढला जात आहे. हा पूल पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यावा, अशी लोकांची मागणी आहे.

हा पूल बांधताना या भागातून गेलेल्या सेवा वाहिन्यांचे स्थलांतर करण्यासाठी ठेकेदाराचा बराच वेळ गेला. पुलाचे काम सुरूच आहे. अन्य कामांसाठी वेळ गेल्याने पुलाचे प्रत्यक्ष काम करण्यास विलंब झाला. दीड महिन्यात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
    – राजन मराठे,  नगरसेवक