रेल्वेसेवा बंद असल्याचा असाही फटका

ठाणे : लोकल प्रवासास अजूनही मुभा नसल्याचा फटका आता नौपाडावासीयांना बसू लागला आहे. कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई यासारख्या परिसरातून कामानिमित्ताने अथवा खरेदीसाठी खासगी वाहनांनी मूळ शहरात येणाऱ्यांची संख्या  वाढली आहे. ही वाहने मनमानी पद्धतीने उभी केली जात असल्याने नौपाडय़ातील स्थानिक रहिवासी आणि वाहनचालकांमध्ये वरचेवर खटके उडू लागले आहेत. हे प्रमाण इतके वाढले आहे की ठाणे वाहतूक शाखेकडे दररोज १० ते १५ तक्रारी प्राप्त होऊ लागल्या आहेत.

यामुळे या भागात आता पुन्हा एकदा बेकायदा पार्किंगचा मुद्दा स्थानिक रहिवाशांसाठी त्रासाचा ठरू लागला आहे.  लोकल गाडय़ा बंद असल्याने कल्याण, डोंबिवली भागातून कामानिमित्त किंवा रेल्वे स्थानक परिसरात खरेदीसाठी खासगी वाहनांमधून येणाऱ्यांची संख्या अलीकडच्या काळात वाढली आहे. ही मंडळी नौपाडय़ातील वेगवेगळ्या परिसरात मिळेल त्या जागी वाहने उभी करू लागले आहेत.  ठाणे वाहतूक पोलिसांकडे गेल्या महिन्याभरापासून इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर वाहने उभी करणे, रस्त्यावर अडथळा आणत वाहन उभे करणे अशा किमान १० ते १५ तक्रारी रोज दाखल होत आहेत. घंटाळी, राम मारुती रोड, नौपाडा पोलीस ठाणे परिसर या भागांचा यामध्ये सर्वाधिक समावेश आहे. या वाहनांवर कारवाईसाठी वाहतूक पोलिसांचीही धावपळ सुरू झाली आहे. वाहन चालकांकडूनही सोसायटीमधील रहिवाशांवर आरोप करण्यात येत आहे. ऑनलाइन वस्तू घरपोच देणाऱ्या एका चालकाने सांगितले की, आम्हाला सोसायटीत प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे नाइलाजाने रस्त्यावर किंवा प्रवेशद्वारासमोर वाहन उभे करावे लागते.

नौपाडा भागातील नागरिकांकडून पोलीस नियंत्रण कक्षाकडे बेकायदा वाहने उभी केल्याप्रकरणी तक्रारी सातत्याने वाढू लागल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई होत असते. 

अमित काळे, उपायुक्त, वाहतूक शाखा.

सोसायटय़ांनी नियम आखून बाहेरील व्यक्तीस वाहन घेऊन आत येण्यास बंदी घातलेली असते. त्यामुळे नाइलाजाने एखादी व्यक्ती त्या सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ वाहन उभे करत असेल. नियम व अटी आखून सोसायटीत प्रवेश द्यावा. त्यामुळे बेकायदा वाहन उभे करण्याचा प्रश्न सुटेल.

-अ‍ॅड. ओमकार राजुरकर