02 June 2020

News Flash

उन्हाळ्यात दिवावासीयांसमोर अन्न-पाण्याचा पेच 

किराणा मालासाठी ठेवलेल्या शिलकीतून टँकरद्वारे पाणीखरेदी करण्याची वेळ

संग्रहित छायाचित्र

टंचाईचे सावट गडद; किराणा मालासाठी ठेवलेल्या शिलकीतून टँकरद्वारे पाणीखरेदी करण्याची वेळ

आशीष धनगर, लोकसत्ता

ठाणे : टाळेबंदीत हातचा रोजगार गेल्याने चिंतेचे ढग दाटले असताना उन्हाळ्यात दिव्यातील रहिवाशांसमोर भीषण पाणी टंचाईचे सावट अधिक गडद होत आहे. दिव्यातील अनेक भागांत पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. येथील रहिवाशांना महिन्याकाठी चार ते पाच हजार रुपये खर्चून संपूर्ण इमारतीसाठी टँकरचे पाणी खरेदी करावे लागते. यंदाही मे महिन्यात दिव्यातील पाणी टंचाईचा चटका अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे टाळेबंदीत आर्थिक शिलकीतून दोन वेळच्या जेवणाचा खर्च भागवायचा की पाणी खरेदी करायची, असा पेच अनेकांसमोर उभा राहिला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा भाग हा अनधिकृत बांधकामांसाठी ओळखला जातो. आजमितीस दिव्याची लोकसंख्या पाच लाखांपेक्षा अधिक आहे. तरीही पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे पायाभूत सुविधांची येथे वानवा आहे. सातत्याने उभी राहणारी बांधकामे आणि अपुऱ्या नियोजनाअभावी दिव्यात गेली कित्येक वर्षे तीव्र पाणी टंचाई समस्या कायम आहे.

दिव्यात पाणीपुरवठय़ाच्या अवेळी येणारे पाणी, मुख्य वाहिनीवरून टँकरमाफियांची पाणीचोरी, सातत्याने तुटणाऱ्या जलवाहिन्या आणि नळाद्वारे होणारा अशुद्ध पाणीपुरवठा अशा असंख्य तक्रारींमुळे रहिवासी त्रस्त आहेत. महापालिकेतर्फे पाणीपुरवठय़ाचे नियोजन नसल्याने दिव्यातील अनेक चाळी आणि इमारती आजही टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. दिव्यातील अनेक इमारतीच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये दिवसाआड पाण्याचे टँकर आणून पाणीपुरवठा केला जातो. या इमारती तसेच लगतच्या चाळीतील काही कुटुंबे मिळून ५०० ते दीड हजार रुपये मोजून टँकरचे पाणी खरेदी करतात. मात्र, टाळेबंदीत रोजगार बंद असल्याने अन्नधान्य खरेदी करायचे की पाणी खरेदी करायचे, असा प्रश्न या नागरिकांसमोर उभा राहिला आहे.

दिवा पूर्वेला श्लोकनगर परिसर आहे. या परिसरात २०० हून अधिक चाळी आहेत. या परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. तर, अनेकदा नळाला येणारे पाणी हे दूषित असते. काही वेळा पाण्याला फेस आणि दुर्गंधी येते.

दिवसाआड आणि कमी दाबाने पाणी

’ या ठिकाणी राहणारे सुरेंद्र यादव मार्च महिन्याच्या अखेरीपासून रोजगार बंद असल्याने घरातच आहेत. ‘एरवी काम सुरू असल्याने पाण्याच्या खर्चासाठी पगारातली काही रक्कम बाजूला काढून ठेवत होतो. मात्र, सध्या सर्वच ठप्प असल्याने शिलकीतून पाणी खरेदी लागत आहे. पण, महिन्याचा किराणा मालही आणावा लागेल. त्या वेळी स्थिती अधिक बिकट असेल’, असे यादव यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

’ बीआरनगर परिसरातील कुटुंबांची स्थिती याहून काही वेगळी नाही. या परिसरात शीला गुप्ता यांच्या कुटुंबात सहा सदस्य आहेत. येथील चाळींमध्ये एक दिवसाआड व रात्री १२ वाजेनंतर पाणी येते. अर्थात तो कमी दाबाने होतो. त्यामुळे मग खूपच कमी पाणी उपयोगासाठी उरते. त्यामुळे नागरिक टँकरचे पाणी मागवतात. टाळेबंदीत अनेक कुटुंबे व संस्थांकडून मिळणाऱ्या अन्न-धान्यावर गुजराण सुरू आहे.

टँकरवाल्यांचे खिसे तुडुंब

दिवा परिसरात शिवसेनेचे आठ नगरसेवक आहेत. ठाणे महापालिकेतही शिवसेनेची सत्ता आहे. दिव्यातील पाणी टंचाईमुळे टँकरने पाणीपुरवठा करणाऱ्यांची या काळात मोठी कमाई होत असते. उन्हाळ्याच्या काळात दरवर्षी येथील रहिवाशांची टँकर चालकांकडून पिळवणूक होत असते. यंदा करोनाच्या काळातही पाण्याचे वाढीव दर आकारून ही पिळवणूक सुरू असून शिवसेनेचे नगरसेवक याकडे डोळेझाक करत असल्याच्या तक्रारी आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2020 4:57 am

Web Title: residents of divya face severe water scarcity in summer zws 70
Next Stories
1 नौपाडाही आजपासून बंद
2 करोना संकटकाळात कर्मचाऱ्यांचा तुटवडा
3 जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी नवी शक्कल
Just Now!
X