27 October 2020

News Flash

bhiwandi building collapse : ‘टाळेबंदीने घात केला!’

नोटीस मिळूनही जिलानी इमारतीतील रहिवाशांना स्थलांतर करण्यात अडचणी

नोटीस मिळूनही जिलानी इमारतीतील रहिवाशांना स्थलांतर करण्यात अडचणी

आशीष धनगर-किशोर कोकणे, लोकसत्ता

ठाणे : पावसाळा सुरू होण्यापूर्वीच महापालिकेची नोटीस आली..‘घरे रिकामी करा, इमारत धोकादायक आहे.’ यापूर्वीही अशा नोटिसा यायच्या. यंदा मात्र विभाग कार्यालयातील काही अधिकारी येऊन सांगून गेले. इमारतीचा पाया खचत चालला आहे. फार वेळ काढू नका इथे. हा इशारा तसा पुरेसा होता. आमच्यापैकी काहींनी दुसरा निवारा शोधण्यास सुरुवातही केली. परंतु करोना आडवा आला. सततची टाळेबंदी. संपूर्ण यंत्रणा करोना निवारण्यात व्यग्र. आमच्यापैकी काहींना शोधूनही इतर ठिकाणी घर सापडत नव्हते. मग विचार केला इतकी वर्षे निघाली. हा पावसाळाही तरून निघू. घडले मात्र भलतेच.. जिलानी इमारत दुर्घटनेतून बचावलेल्या बहुतेकांच्या तोंडी हीच कहाणी होती.

जिलानी इमारत कधी तरी कोसळणार हे या भागातील जवळपास सर्वानाच माहीत असल्यासारख्या प्रतिक्रिया सोमवारी या दुर्घटनेनंतर येथे उमटताना दिसत होत्या. इमारत जुनी होती हा मुद्दा नव्हताच. या इमारतीच्या तळघरात असलेल्या बेकायदा यंत्रमागाच्या धक्क्याने ती केव्हाच खंगली होती. यंत्रमाग बंद झाल्यानंतर या ठिकाणी पावसाचे पाणी साचू लागले होते. त्यामुळे पाया खंगतोय हे स्पष्ट दिसत होते. फेब्रुवारी महिन्यात या इमारतीतील रहिवाशांना घरे रिकामी करण्याची सूचना पालिका प्रशासनाने दिली होती. त्यानंतर सगळीकडे करोनाचा हाहाकार सुरू झाला. पुढे मे महिन्याच्या अखेरीस पुन्हा महापालिकेची नोटीस मिळाली. यंदा मात्र नोटीस बजाविताना काही कर्मचारी अगदी काळजीने बोलत होते. परंतु करोनाने घात केला, अशी प्रतिक्रिया येथे राहणाऱ्या अहमत अन्सारी या २८ वर्षीय तरुणाने दिली.

घरे शोधत होतो..पण मिळाली नाहीत

करोनाचा काळ असल्याने अनेकांना घरे मिळणे कठीण होते. काहींनी करोनाचा प्रादुर्भाव संपल्यावर घरे रिकामी करू, असा विचार केला होता. मात्र, त्याआधीच रहिवाशांवर काळाने झडप घातली. या इमारतीचा सुमारे अर्धा भाग सोमवारी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास कोसळला. या घटनेची माहिती स्थानिक रहिवाशांना मिळाली. त्यानंतर संपूर्ण भागात जोरदार आरडाओरड आणि घबराटीचे वातावरण पसरले. आसपासच्या इमारतीतील रहिवाशांनी तात्काळ याची माहिती पोलीस आणि महापालिका प्रशासनाला दिली. तोपर्यंत परिसरातील नागरिकांनी बचावलेल्यांना  आणि अध्र्या इमारतीच्या भागातील रहिवाशांना परिसरातील मदरशामध्ये हलवले. तसेच ज्या नागरिकांना वाचवणे शक्य झाले, त्यांना आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दुर्घटनेत बचावलेल्या समीर शेख (१९) याने सांगितले की, रात्रीच्या शांततेत इमारतीच्या भिंतींना तडे जाऊ  लागले. इमारतीतील सर्व कुटुंबे बाहेर पडण्याच्या तयारीत असताना अर्धी इमारत पत्त्यासारखी कोसळली. अंगावर इमारतीचा ढिगारा पडला होता. आता मृत्यू झडप घालणार होता. पण सहा तास जीव मुठीत धरून होतो. बचाव पथकाने मला ढिगाऱ्यातून बाहेर काढले. या इमारतीत राहणारे, मोमीन शेख (४५) हेही या घटनेत जखमी झाले होते. त्यांनी सांगितले की, घरांना तडे जाऊ  लागल्यानंतर त्यांचे आई-वडील तात्काळ घरातून बाहेर पडू लागले. मात्र, अवघ्या १० मिनिटांत इमारत कोसळली. माझे आई-वडील या इमारतीच्या ढिगाऱ्यात अडकले आहेत.

दोन वर्षांपूर्वी दुरुस्ती

इमारत मोडकळीस येत असताना दोन वर्षांपूर्वी या इमारतीच्या दुरुस्तीसाठी प्रत्येकी १७ हजार रुपये काढले होते. त्या वेळेस त्याची डागडुजी करण्यात आली होती, अशी माहिती एका रहिवाशाने दिली.

पावसाच्या पाण्यामुळे इमारत कमकुवत?

ही इमारत बांधली तेव्हा या ठिकाणी वस्ती नव्हती. मात्र १० वर्षांत येथे मोठय़ा प्रमाणात वस्ती तयार झाली. या इमारतीच्या तळघरात पावसाळ्यात पूर्ण पाणी साचत होते. थोडा पाऊस झाला. तरी ३ दिवस या इमारतीखाली साचलेले पाणी काढण्यास वेळ जात होता, अशी माहिती शेजारील इमारतीत राहणाऱ्या समीर अन्सारी यांनी दिली. पावसाच्या पाण्यामुळे इमारतीचा पाया कमकुवत असल्याचे बोलले जात आहे.

दुर्घटनेतील मृत

* झुबेर खुरेशी (वय ३०)

* फायजा खुरेशी (५)

* आयशा खुरेशी (७)

* बब्बू (वर्ष)

* फातमा जुबेर बबु (२)

* फातमा जुबेर कु रेशी (८)

* उजेब जुबेर (६)

* असका आबिद अन्सारी (१४)

* अन्सारी दानिश अलिद (१२)

* सिराज अहमद शेख (२८)

* नाजो अन्सारी (२६)

* सनी मुल्ला शेख (७५)

जखमी

* हेदर सलमानी (वय २०)

* रुकसार खुरेशी (२६)

* मोहम्मद अली (६०)

* शबीर खुरेशी (३०)

* मोमीन शमीऊहा शेख (४५)

* कैसर सिराज शेख (२७)

* रुकसार जुबेर शेख (२५)

* अबुसाद सरोजुद्दीन अन्सारी (१८)

* आवेश सरोजुद्दीन अन्सारी (२२)

* जुलेखा अली शेख (५२)

* उमेद जुबेर कु रेशी (४)

* आमीर मुबिन शेख (१८)

* आलम अन्सारी (१६)

* अब्दुला शेख (८)

* मुस्कान शेख (१७)

* नसरा शेख (१७)

* इब्राहिम (५५)

* खालिद खान (४०)

* शबाना शेख (५०)

* जारिना अन्सारी (४५)

धोकादायक इमारती

७७ अतिधोकादायक इमारती ठाणे महापालिका क्षेत्रात आहेत. शहरात  ४२२६ धोकादायक इमारती आहेत. अतिधोकादायक इमारती रिकाम्या करून त्यांचे बांधकाम तोडण्यात आले आहे.

२४० अतिधोकादायक, तर ४५० धोकादायक  इमारती कल्याण-डोंबिवली शहरात   आहेत. यापैकी काही इमारती महापालिका प्रशासनाने रिकाम्या केल्या आहेत.

२३७ धोकादायक इमारती भिवंडीत आहेत. त्यापैकी बहुतांश इमारतींमध्ये नागरिक वास्तव्य करीत आहेत.

१५० एकूण धोकादायक इमारती उल्हासनगर शहरात आहेत. पैकी अतिधोकादायक ३० इमारती आहेत. त्यातील १४ इमारतींमध्ये नागरिक राहत असून १६ इमारती रिकाम्या आहेत. ११३ धोकादायक तर ७ दुरुस्तीयोग्य इमारती आहेत.

१७६ धोकादायक बांधकामे अंबरनाथ शहरात आहेत. त्यातील ४० बांधकामे अतिधोकादायक आहेत.

३२७ धोकादायक बांधकामे बदलापूर शहरात आहेत.

उल्हासनगरात अनेक इमारती धोकादायक

उल्हासनगर शहरात १९९० च्या दशकात बांधलेल्या निम्म्याहून अधिक इमारती धोकादायक अवस्थेत आहेत. मात्र यापूर्वीच वापरले गेलेले अधिकचे चटईक्षेत्र, रहिवाशांकडे नसलेले मालकी दस्तऐवज व समूह विकास योजनेच्या अभावामुळे इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न रखडलेला असून नागरिक धोकादायक इमारतीत वास्तव्य करत आहेत. राज्याच्या  विकास धोरणात उल्हासनगरचा वेगळा विचार करण्याची मागणी होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2020 1:59 am

Web Title: residents of jilani building face difficulties to vacate building despite notice zws 70
Next Stories
1 दाट वस्त्यांमुळे मदतीत अडचणी
2 यंत्रमाग कारखान्यांमुळे भिवंडीतील इमारतींना धोका?
3 धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाची रखडपट्टी
Just Now!
X