ठाण्यातील रहिवासी संकुलांमध्ये पार्किंगविषयक असंख्य अडचणी असून अनेक गृहसंकुलांमध्ये पार्किंगसाठी पुरेशी जागासुद्धा उपलब्ध नाही. त्यातच पार्किंगची कोणतीच तरतूद नसतानाही एकापेक्षा अधिक वाहने खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल आहे. त्यामुळे पार्किंगच्या जागेपेक्षाही अधिक गाडय़ा पार्किंगच्या जागेत येऊ लागल्या असून त्याचा वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे प्रत्येक गृहसंकुलातील रहिवाशांनी वाहतुकीच्या नियमांचे योग्य पालन केल्यास या समस्या सुटण्यास मदत होईल, असे प्रतिपादन वाहतूक निरीक्षक दीपक बांदेकर व श्रीकांत धरणे यांनी केले. लोढा पॅराडाईड येथील रहिवासी संकुलात जेष्ठ नागरिकांच्या गटाने व रहिवाशांनी नवे रिक्षा थांबा सुरू केला. या थांब्याच्या उद्घाटनास पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावेळी वाहतूक पोलिसांनी उपस्थित रहिवाशांशी संवाद साधला.
वाहतूक जनजागृती
वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर व साहाय्यक पोलीस आयुक्त पी. मठाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या वाहतूक जनजागृती करण्याचे काम ठाण्यात सुरू आहे. लोढा पॅराडाईडच्या व्यवस्थापकीय समितीने रहिवाशांसाठी अशा प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे. नवीन वाहन खरेदी करताना प्रादेशिक परिवहन विभागाने वाहनाच्या पार्किंगची व्यवस्थाही पाहण्याची गरज आहे. त्यासाठी आवश्यक दाखला असल्याची खात्री करणे गरजेचे आहे. वाहतूक पोलिसांचा तसा प्रस्ताव असून या माध्यमातून गृहसंकुलातील पार्किंगचा प्रश्न सुटू शकेल, असे मत पोलीस निरीक्षक दीपक बांदेकर यांनी व्यक्त केले.