करोनाचे संशयित वाढण्याच्या शक्यतेने जिल्हा प्रशासनाची खबरदारी; जिल्ह्यत साडेतीन हजारांहून अधिक जणांची तपासणी

ठाणे : ठाणे जिल्ह्यत करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून आतापर्यंत ७९ जणांमध्ये या आजाराची लक्षणे आढळून आली आहेत. या विषाणूचा प्रसार वाढल्यास रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागातील  रिसॉर्ट, फार्म हाऊस तसेच हॉटेलांमधील खोल्यांचा वापर विलगीकरण कक्ष म्हणून करण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्ह्यतील ग्रामीण भागात असणारे फार्म हाऊस, रिसार्ट आणि हॉटेल यांची माहिती गोळा करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने गटविकास अधिकाऱ्याना दिले आहेत.

ठाणे जिल्ह्यतील सर्व महापालिका क्षेत्र आणि ग्रामीण भागांमध्ये असलेल्या सरकारी रुग्णालयांमध्ये करोना संसर्गाच्या संशयितांसाठी विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यतील महापालिका क्षेत्रात असलेल्या बीएसयूपीच्या रिकाम्या इमारतींमध्ये विलगीकरण कक्ष तयार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.

सध्या ठाणे जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात विलगीकरण कक्ष उपलब्ध आहेत. मात्र, येणाऱ्या काही दिवसांत करोना  संशयितांमध्ये वाढ झाल्यास विलगीकरण कक्ष कमी पडू नयेत, यासाठी जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. कल्याण, मुरबाड, शहापूर, अंबरनाथ, भिवंडी या तालुक्यात मोठय़ा प्रमाणात फार्म हाऊस आणि रिसॉर्ट आहेत. तसेच या तालुक्यांमधून जाणाऱ्या मुख्य महामार्गांलगत मोठय़ा प्रमाणात हॉटेले आहेत. या फार्म हाऊस, रिसॉर्ट आणि हॉटेलांचा वापर विलगीकरण कक्षांसाठी करण्याचा विचार जिल्हा प्रशासनाने सुरू केला आहे. यासाठी जिल्ह्यतील पाच पंचायत समितींच्या गटविकास अधिकाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रांमध्ये असलेल्या फार्म हाऊस, रिसॉर्ट आणि हॉटेलांची माहिती गोळा करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. गटविकास अधिकाऱ्यांकडूनही युद्ध पातळीवर तालुकानिहाय माहिती गोळा करण्यात येत असून ही सर्व माहिती जिल्हा प्रशासनाला सादर केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे जिल्ह्यत १३ जणांना लागण; ७९ संशयित रुग्णांची नोंद

ठाणे : करोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परदेशातून प्रवास  करून आलेल्या आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची जिल्हा आणि महापालिका आरोग्य विभागाकडून तपासणी केली जात आहे. त्यामध्ये आतापर्यंत परदेशातून प्रवास करून आलेल्या ५७३ तर त्यांच्या संपर्कात आलेल्या ३१२३ अशा एकूण ३६९६ जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये आतापर्यंत ७९ जणांमध्ये करोनाची लक्षणे आढळून आली असून या सर्वाना उपचारासाठी मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी १३ जणांना आतापर्यंत करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून त्याचबरोबर १९० जणांचा १४ दिवस घरात वेगळे राहण्याचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली.