News Flash

मीरा-भाईंदरच्या क्रीडासंकुलात उपाहारगृह

क्रीडासंकुल चालवणाऱ्या कंत्राटदाराने या ठिकाणी चक्क उपाहारगृह सुरू केले असून ते सर्वासाठी खुले केले आहे. 

(संग्रहित छायाचित्र)

कंत्राटदाराकडून व्यावसायिकरण

भाईंदर पूर्व येथे सुरू असलेल्या मीरा-भाईंदर महापालिकेच्या क्रीडासंकुलाचे व्यावसायिकरण करण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. क्रीडासंकुल चालवणाऱ्या कंत्राटदाराने या ठिकाणी चक्क उपाहारगृह सुरू केले असून ते सर्वासाठी खुले केले आहे.

अनेक वर्षांपासून रखडलेले क्रीडासंकुल महापालिकेने काही महिन्यांपूर्वीच सुरू केले आहे. क्रीडासंकुल चालवणे महापालिकेला शक्य नसल्याने ते कंत्राटदाराच्या माध्यमातून चालवण्यात येत आहे. क्रीडासंकुलाची देखभाल तसेच महापलिकेने विविध क्रीडाप्रकारांसाठी निश्चित करून दिलेल्या शुल्काची वसुली कंत्राटदार करत आहे.

क्रीडाप्रकारांसोबतच केवळ क्रीडासंकुलात येणाऱ्यांसाठी छोटे उपाहारगृह चालवण्याची परवानगी करारनाम्यानुसार कंत्राटदाराला देण्यात आली आहे. क्रीडासंकुलाच्या वेळेतच हे उपाहारगृह सुरू ठेवणे अपेक्षित आहे. परंतु प्रत्यक्षात कंत्राटदाराने या ठिकाणी भलेमोठे उपाहारगृह सुरू केले आहे आणि त्याचे स्वतंत्र प्रवेशद्वार ठेवले असल्याने क्रीडासंकुलात येणाऱ्यांव्यतिरिक्त बाहेरच्या लोकांनाही त्यात प्रवेश दिला जातो, तसेच इतर खासगी हॉटेलमध्ये मिळणारे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ या हॉटेलमध्येही उपलब्ध करण्यात आले आहेत आणि रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यात येत असते.

क्रीडासंकुलात मोठे उपाहारगृह सुरू करणे बेकायदा असून कंत्राटदाराने नियमांचे उल्लंघन केले आहे. त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. मनसेच्या शिष्टमंडळाने महापालिकेचे उपायुक्त दीपक पुजारी यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली.

याप्रकरणी कंत्राटदारासोबत महानगरपालिकेने केलेल्या करारनाम्यातील अटी-शर्तीची तासणी करून योग्य ती कारवाई केली जाईल.

– दीपक पुजारी, उपायुक्त

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2018 1:45 am

Web Title: restaurant in mira bhayander sports complex
Next Stories
1 मीरा-भाईंदरमध्येही ‘निर्भया’ पथक
2 जूचंद्र येथे आजपासून फिरते वीजबिल भरणा केंद्र
3 भाजप आणि राष्ट्रवादीचे कलानी प्रेम!
Just Now!
X