भाईंदर : करोनाकाळात रात्रीच्या सुमारास हॉटेल अधिक काळ चालू ठेवण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. त्यानुसार आता शहरातील हॉटेल व्यावसायिकांना ती रात्री ११.३० पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी पालिका आयुक्त विजय राठोड यांनी दिली.

टाळेबंदी नियमांना शिथिल करत राज्य शासनाने ५ ऑक्टोबरपासून ५० टक्के क्षमतेने हॉटेल सुरू करण्यास परवानगी दिली होती. मात्र, हॉटेलचालकांना सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवता येणार होती; परंतु या वेळेस ग्राहक हॉटेलमध्ये जेवण्यासाठी येत नसून रात्री ८ ते ११ वाजेपर्यंत हॉटेलांत ग्राहकांची गर्दी असते. त्यामुळे हॉटेलचालकांचे मोठे नुकसान होत होते.

शहरातील हॉटेल सुरू ठेवण्याची वेळ वाढवून द्यावी या मागणीसाठी मीरा-भाईंदर हॉटेल असोसिएशनच्या वतीने १६ ऑक्टोबर रोजी आयुक्त आणि महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांची भेट होती. त्यानंतर १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी आयुक्तांनी आदेश काढून हॉटेल सुरू ठेवण्याची वेळ सकाळी आठ वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत वाढवून दिली होती. परंतु इतर शहरांतील महापालिकांनी ११ वाजेपर्यंत परवानगी दिली असताना आमच्यावर असा अन्याय का, असा सवाल हॉटेलचालकांनी विचारला होता आणि पालिकेच्या आदेशाचा विरोध करत हॉटेल व्यावसायिकांना ही वेळ अपुरी पडू लागल्याने अनेक व्यावसायिकांनी हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, व्यायामशाळाही सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.