महापालिका प्रशासनाने सोमवारी रात्री प्रसिद्ध केलेल्या पत्रातील गैर समजुतीतून शहरात टाळेबंदी लागू झाल्याची अफवा पसरली होती. यामुळे नागरिक धास्तावल्याने अखेर प्रशासनाने मंगळवारी नवे पत्रक काढून त्याद्वारे स्पष्टीकरण दिले आहे. त्यात शहरातील सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र असणाऱ्या ठिकाणीच निर्बंध घालण्यात आले असून शहरात सरसकट टाळेबंदी करण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात फेब्रुवारी महिन्यापर्यंत करोना रुग्ण संख्या आटोक्यात होती. दररोज सरासरी ६० ते ७० रुग्ण आढळत होते. शहरात केवळ तीनच संवेदनशील ठिकाणे होती. मात्र, मार्च महिन्यात रुग्ण संख्या वाढू लागली असून शहरात सरासरी दररोज १५० ते २०० रुग्ण आढळत आहेत. यामुळे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी रुग्ण संख्या वाढत असलेल्या भागाचे नव्याने सर्वेक्षण केले. त्याआधारे त्यांनी शहरातील १६ परिसरातील ६६ संवेदनशील ठिकाणांची यादी जाहीर करून त्याठिकाणी टाळेबंदी लागू केली.

यासंबंधीच्या आदेशाचे पत्रक सोमवारी रात्री समाजमाध्यमांवर प्रसारित होताच शहरात टाळेबंदी लागू झाल्याची अफवा पसरली होती. त्यामुळे शहरातील नागरिक धास्तावले.

या प्रकरणाची राज्य शासनाने दखल घेतली आणि त्यानंतर माहपालिका प्रशासनाने याबाबत खुलासा करणारा नवा आदेश मंगळवारी सायंकाळी काढला. त्यात शहरातील सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र वगळता शहरात कोणत्याही प्रकारे सरसकट टाळेबंदी लागू करण्यात आलेली नाही. तसेच ज्या आस्थापना सुरू आहेत, त्या आस्थापना यापुढेही सुरू राहणार आहेत.