मानसी जोशी

अवकाळी पावसाचा उत्पादनावर परिणाम; दर शंभर रुपये प्रतिकिलोवर

वरणापासून भाजीपर्यंत प्रत्येक फोडणीत आवश्यक असलेला आरोग्यकारी लसूण गेल्या काही दिवसांपासून दरवाढीमुळे ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरू लागला आहे. राज्यातील काही भागांत झालेल्या अवकाळी पावसामुळे लसणाचे उत्पादन घटले आहे. याचा थेट परिणाम दरांवर झाला असून मुंबई, ठाण्यातील काही बाजारांत उत्तम प्रतीचा लसून १०० रुपये किलो दराने विकला जात आहे.

आहारात फोडणीसाठी लसणाचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला जातो. घाऊक बाजारात महिनाभरापूर्वी २० रुपयांना मिळणाऱ्या लसणाची किंमत गेल्या पंधरवडय़ापासून किलोमागे ५० रुपये एवढी झाली आहे. घाऊक बाजारात उत्तम प्रतीच्या मालाची किंमत वाढताच किरकोळ विक्रेत्यांनी ग्राहकांची अक्षरश लूट सुरू केली असून काही ठिकाणी तो १०० रुपयांना विकला जात आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात ठाणे, वाशी आणि कल्याण येथील बाजारांमध्ये लसणाची आवक होते.

मुंबईच्या बाजारात नाशिक, पुणे, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात या प्रदेशांमधून लसूण येतो. डिसेंबर महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. या अवकाळी पावसाचा मोठा परिणाम लसणाच्या उत्पादनावर झाल्याने बाजारात यंदा लसणाची आवक घटली आहे. दर वर्षी कल्याण आणि वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दर महिन्याला १२ ते १३ गाडय़ा भरून येणाऱ्या लसणाची आवक यंदा मात्र ८ ते ९ गाडय़ांवर आली आहे.

तुलनेने मागणी जास्त आणि उत्पादन कमी अशी परिस्थिती असल्याने किंमत वाढल्याची माहिती वाशी बाजारपेठेतील घाऊक विक्रेते मेहुल कोठारी यांनी दिली. त्यामुळे उन्हाळ्यात चिकन-मटण खरेदीला नाक मुरडणाऱ्या आणि सात्त्विक आहाराकडे वळलेल्या ग्राहकांना आता लसणानेही शंभरी गाठल्याने खरेदीसाठी खिसा गरम करावा लागणार आहे.

भाज्याही कडाडल्या

किरकोळ बाजारात दर किलोमागे २० रुपयांना विकली जाणारी कोबी आता ३० ते ४० रुपये भावाने विकली जात आहे. तसेच १५ ते २० रुपयांन विकली जाणारी कोथिंबिरीची जुडी आता ७० रुपयांना बाजारात विकत आहे. तर चवळीची विक्री आठवडाभरापूर्वी ३० ते ४० रुपयांना होत होती, आता ७० ते ८० रुपयांना होत आहे. फळभाज्यांसोबतच पालक, लाल माठ, करडई, मेथी, शेपू या पालेभाज्यांसाठी ग्राहकांना २० ते ३० रुपये मोजावे लागत आहेत. भाज्या महाग झाल्याने ग्राहक कडधान्याला पसंती देत असल्याचे कडधान्य विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

अवकाळी पावसाने यंदा लसणाचे उत्पन्न कमी झाले आहे. त्यामुळे लसणाचे भाव वधारले असून किरकोळ बाजारात १०० रुपये किलो दराने लसणाची विक्री होत आहे. तसेच उन्हाचा पारा वाढल्याने येत्या काही दिवसांत भाज्यांच्या दरातही वाढ होण्याची शक्यता आहे.

– राजू जाधव,किरकोळ भाजी विक्रेता