tvlog02एखाद्या कार्यालयातून, कंपनीतून, कारखान्यातून निवृत्त झालेले कर्मचारी सहसा त्या ठिकाणी कामाशिवाय जात नाहीत. निवृत्त झालेल्या आपल्या अन्य सहकार्याशीही त्यांचा फारसा संबंध येत नाही. काही जण स्नेहमेळावा (गेट टुगेदर) आयोजित करण्याचे ठरवतात, पण त्यालाही फारसा प्रतिसाद मिळत नसतो. आपल्या अनेक सहकार्याशी तर निवृत्तीनंतर कधी कधी संपर्कही आलेला नसतो. मात्र ठाण्यातील मो. ह. विद्यालयातील शिक्षक त्यास अपवाद आहेत. या शाळेतील निवृत्त शिक्षक प्रत्येक महिन्यास एक दिवस गप्पागोष्टी करण्यासाठी एकत्र येत आहेत. त्यांच्या या ‘गेट टुगेदर’ उपक्रमाला तब्बल तीस वष्रे झाली आहेत.
या स्नेहमेळाव्यातील भावनेचा ओथंबलेला माहोल अनुभवणे प्रत्येक निवृत्त शिक्षकासाठी अतीव आनंददायक असतो. काही शिक्षक आता काळाच्या पडद्यात गेले, पण वयाची ८० पार केलेले सात ते आठ शिक्षक अजून सातत्याने भेटतात. यात स्त्री-पुरुष असा भेदभाव नाही. यंदा ३ एप्रिल रोजी या शाळेतील निवृत्त झालेले ३५ शिक्षक एकत्र आले. सुबोध देशपांडे, बलुकाका पेंडसे, उषा केळकर, मंगला कर्वे, अपर्णा पटवर्धन आदी काही शिक्षक शाळेत या स्नेहमेळाव्यात सहभागी झाले. निर्मल मैत्री ही मो. ह. विद्यालयातील या निवृत्त शिक्षकांची संस्कृती. त्यांच्यामुळेच या शाळेतून अनेक उत्तम विद्यार्थी घडले. या शाळेतील अनेक माजी विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. उदाहरणच द्यायचे झाले तर भाभा शिक्षण संस्थेचे ‘डीन’ डॉ. हेमचंद्र प्रधान, प्राचार्य सोहोनी, प्राचार्य दाऊद दळवी, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक, अभिनेते कुमार सोहोनी, संपदा जोगळेकर-कुलकर्णी, मुकुंद मराठे, मुकुंदराज देव, डॉ. राजकुमार केतकर. या शाळेतील अनेक विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. डॉ. चंद्रशेखर वावीकर, डॉ. नितीन बुरकुले, नितीन नरवणे, संदीप केळकर, पराग देशपांडे, अतुल देशपांडे आदी वैद्यकीय तज्ज्ञ याच शाळेचे माजी विद्यार्थी. शतायुषी दत्ताजी ताम्हाणे, समता मंचचे संजय मंगो, सतीश प्रधान, कांती कोळी, प्रकाश परांजपे, आनंद दिघे आणि आता ठाण्याचे खासदार असेलेले राजन विचारे यांनी आपले शालेय शिक्षण याच शाळेतून घेतले आहे.

तीन पिढय़ांचे नाते
या शाळेतील माजी शिक्षिका केळकर बाई यांचे चिरंजीव म्हणजेच ठाण्यातील निवडून आलेले आमदार संजय केळकर. सर्व शिक्षक एकत्र येणार आहेत, हे समजल्यावर त्यांच्याशी संवाद साधावा यासाठी आमदार केळकर मुद्दाम या स्नेहमेळाव्यास आले. केळकर यांचे बाबा याच शाळेतील विद्यार्थी व शिक्षक. ज्यांच्यामुळे या शाळेचा नावलौकिक वाढला ते एन. टी. केळकर हे आमदार केळकर यांचे आजोबा आणि मो. ह. विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक. तीन पिढय़ांचे नाते असल्यामुळे केळकर कुटुंबीयांना या शाळेबाबत विशेष आपुलकी आहे.

अपर्णा पटवर्धन