डोंबिवलीतील टिळकनगर शाळेतून १९८४ मध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी यंदा पुन्हा एकदा संमेलन भरवून आपले शाळेतील मैत्रिबंध अधिक दृढ केले. २००५ मध्ये या शाळासोबत्यांनी त्यांचे पहिले संमेलन भरविले होते. त्यानंतर सलग दहा वर्षे संमेलनांचा हा सिलसिला सुरू आहे.
शाळेत सहलीला नेणाऱ्या शिक्षकांविषयी कृतज्ञता म्हणून या विद्यार्थ्यांनी चार वर्षांपूर्वी शिक्षक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना माळशेजची सहल घडवून आणली. शाळेच्या नव्या इमारतीच्या उभारणीत या बॅचचे मिलिंद फाटक, माधव चिकोडी या विद्यार्थ्यांचे मोठे योगदान आहे. त्याचप्रमाणे या वास्तूच्या महापालिकेतील कामकाजाविषयी राजेश देशपांडे आणि लोकप्रतिनिधी राजन मराठे यांची खूप मदत होते. १९८४ च्या बॅचला त्याचा अभिमान आहे.
मैत्रोत्सव या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या संमेलनापूर्वी यंदा या शाळासोबत्यांनी शाळेला भेट दिली. सुमारे ५० जण शाळेच्या जुन्या वर्गात रमले. त्यातून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. तिथून निघताना अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले.
त्यानंतर दुसऱ्याच दिवशी येऊर येथील गोल्डन स्वान रिसॉर्ट येथे मैत्रोत्सव २०१५ साजरा झाला. त्यात एकूण ८९ माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यातील ३० जण आदल्या रात्रीपासूनच होते. आदल्या रात्री मुले विरुद्ध मुली असा भेंडय़ांचा कार्यक्रम झाला. शेवटचे गाणे सर्वानी मिळून म्हटले.
गाणी, गोष्टी, दिलखुलास नृत्य, मनोगते, सत्कार यामुळे दिवस अगदी मजेत गेला. मुंबई, पुणे, दुबई, नगर आदी ठिकाणांहून मुद्दामहून या सोहळ्यासाठी शाळासोबती आले होते.