विरुद्ध दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनांमुळे इतरांना चकवा

लोकसत्ता वार्ताहर

वसई: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विविध ठिकाणच्या भागात माती भरावाची वाहने, सिमेंट काँक्रीट वाहतूक करणारी व इतर वाहने ही विरुद्ध दिशेने चालविली जात आहेत. यामुळे महामार्गावरून सरळमार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनांना याचा अडथळा निर्माण होत असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

वसई पूर्वेतील भागातून मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या मार्गावरील घोडबंदर पुलापासून ते विरार फाटा या दरम्यान विविध प्रकारची माती भराव इतर कामे सुरू  झाली आहेत. यामुळे माती भरावाचे ट्रक व इतर वाहनांची वाहतूक वाढली आहे. परंतु वाहतूक करताना काही वाहनचालक हे विरुद्ध दिशेने वाहने चालवीत असल्याचे चित्र दिसून आले आहे. या अशा प्रकारामुळे इतर वाहनचालकांना महामार्गावरून धोकादायक प्रवास करावा लागत असल्याचे वाहनचालकांनी सांगितले आहे.

महामार्गावरील मालजीपाडाजवळील लोढाधाम, अन्नपूर्ण उपाहारगृह , मालजीपाडा खाडीपूल या ठिकाणच्या भागातून दररोज मोठय़ा संख्येने वाहने ही विरुद्ध दिशेने प्रवास करतात. परंतु या वाहनचालकांकडे महामार्ग पोलिसांनी दुर्लक्ष केले असल्याने याचा फटका इतर सर्वसामान्य वाहनचालकांना बसू लागला आहे. विशेष करून रात्रीच्या सुमारास ही भरधाव वेगाने येणारी वाहने दिसून येत नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे.

तसेच या वाहतुकीदरम्यान मोठय़ा प्रमाणात धूळ माती रस्त्यावर पडू लागली आहे. त्यामुळे संपूर्ण परिसर हा धुळीचा झाला आहे.

वाहतूक करताना अनेक वाहनचालक हे विरुद्ध दिशेने येऊन वाहतूक करतात. आधीच धुळीच्या कचाटय़ातून वाट काढत वाहनचालकांना प्रवास करावा लागतो. त्यातच विरुद्ध दिशेने येणारे वाहन जर नजरेस पडले नाही तर अपघात होण्याची भीती वाहनचालकांनी व्यक्त केली आहे.

धुळीचा मनस्ताप

महामार्गावर पडणारी धूळ हवेद्वारे येथून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या डोळ्यात व नाकातोंडात जाऊ लागली आहे. त्यामुळे श्वसनाचे आजार बळावण्याची शक्यता आहे. यासोबतच धुळीचे प्रमाण अधिक असल्याने काही वेळा वाहनचालकांना पुढचा रस्ता व कोणते वाहन पुढे आहे हेसुद्धा समजून येत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. तर दुसरीकडे धुळीचे प्रमाण अधिक असल्याने काही वेळा वाहनचालकांना लेन बदलावी लागत असल्याने मागून येणाऱ्या वाहनांची धडक बसण्याची शक्यता आहे. विशेष करून रात्रीच्या सुमारास येथून ये-जा करणाऱ्यांना अधिक मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे वाहनचालकांनी सांगितले आहे.