News Flash

वसईतील तरुणाच्या प्रयत्नामुळे बावखलाचे पुनरुजीवन

मुळे गोडय़ा पाण्याच्या साठय़ासाठी त्या काळात बावखलांची संकल्पना राबवण्यात आली.

वसईतील तरुणाच्या प्रयत्नामुळे बावखलाचे पुनरुजीवन
राकेश रिबेलो या तरुणाने गावातील नष्ट झालेले बावखल पुन्हा जिवंत केले आहे.

बुजवलेल्या बावखलाला गोडय़ा पाण्याचे झरे; मासे, कासवांचा वावर

वसईच्या संस्कृतीचे प्रतीक असलेली आणि पर्यावरणाचा समतोल टिकविणारी बावखले  नष्ट होत असताना वसईतील एका तरुणाने गावातील नष्ट झालेली बावखल पुन्हा जिवंत करून दाखवले आहे. राकेश रिबेलो असे या तरुणाचे नाव असून त्याने एकटय़ाने बुजवलेली बावखल पुन्हा तयार केली. या बावखलात गोडय़ा पाण्याचे झरे आढळल्याने बावखल  पाण्याने भरून गेली आहे. त्यात कासव, मासे आदींची रेलचेल सुरू झाली आहे.

वसईचा भू-प्रदेश चारही बाजूंनी खाडी आणि समुद्राने वेढलेला आहे. त्यामुळे गोडय़ा पाण्याच्या साठय़ासाठी त्या काळात बावखलांची संकल्पना राबवण्यात आली. वसईतील पूर्वी ५०० हून अधिक असणाऱ्या बावखलांची संख्या ३०० पेक्षा कमी झाली असून जी आहेत त्यांचीही अवस्था वाईट झाली आहे.

बावखल नष्ट होत असताना वसईच्या रमेदी गावातील राकेश रिबेलो या तरुणाने पुढे  येऊन नष्ट झालेले एक बावखल पुन्हा जिवंत केले आहे. रमेदी गावातील खोपवाडी येथे लोकांनी मातीचा भराव आणि कचरा टाकून बावखल बुजवून टाकली होती. राकेश रिबेलो या तरुणाने या बावखलाचे महत्त्व ओळखून ते पुन्हा तयार करण्याचे ठरवले. ग्रामस्थांची परवानगी घेतली, मात्र कुणी प्रत्यक्ष मदतीला आले नाही. त्यामुळे राकेशने स्वत: काही दिवस काम करून कचरा काढून बावखल स्वच्छ केली. त्यानंतर जेसीबी आणून मातीचा भराव काढला. या बावखलीच्या खाली गोड पाण्याचे झरे लागले आणि बावखल स्वच्छ पाण्याने भरून गेली. आता या बावखलीत विविध मासे आणि कासवे आली आहेत. गावातील तरुण मासेमारीचा आनंद घेण्यासाठी या बावखलीत येत असतात.

बावखल म्हणजे काय?

पाण्याचा साठा करण्यासाठी खड्डा बनवलेला असतो, त्यास वसईतल्या बोलीभाषेत बावखळ किंवा बावखल असे म्हणतात. बाव म्हणजेच विहीर. वसईचा भू प्रदेश चारही बाजूंनी खाडी आणि समुद्राने वेढलेला आहे. त्यामुळे गोडय़ा पाण्याच्या साठय़ासाठी त्या काळात बावखलांची संकल्पना राबवण्यात आली. पूर्वी रहाट बसवून वाडी, शेतीसाठी आणि इतर कामांसाठी तसेच पाणी पिण्यासाठी देखील याचा वर्षभर वापर केला जात असे. उत्तर कोकणातील काही भागात आजही याचा वापर होतो. बावखलीमुळे जमिनीत ओलसरपणा राहतो. त्यामुळे आजूबाजूच्या विहिरींतील पाण्याची पातळी टिकून राहते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2018 1:02 am

Web Title: revival of bawkhal due to the youths efforts in vasai
Next Stories
1 सेतू बांधला रे कुणी?
2 ‘देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार, चंद्रकांत पाटील मुख्यमंत्री होणार’
3 डोंबिवलीतील व्यावसायिकांचे मलेशियात अपहरण
Just Now!
X