26 September 2020

News Flash

तीन दिवसांत साडेतीन कोटी रुपयांच्या तांदळाची विक्री

ठाणे जिल्ह्य़ातील ब्रॅण्डेंड तांदूळ उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे, पालघरच्या शेतक ऱ्यांच्या सहभागातून सुरू झालेला तांदूळ महोत्सव ग्राहकांच्या प्रतिसादामुळे यशस्वी झाला

| March 3, 2015 12:28 pm

ठाणे जिल्ह्य़ातील ब्रॅण्डेंड तांदूळ उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे, पालघरच्या शेतक ऱ्यांच्या सहभागातून सुरू झालेला तांदूळ महोत्सव ग्राहकांच्या प्रतिसादामुळे यशस्वी झाला असला तरी अखेरच्या दिवशी पडलेल्या अवकाळी पावसाने ग्राहकांच्या उत्साहावर विरजण घातले. तीन दिवसांच्या या महोत्सवासाठी सुमारे ११ क्विंटल तांदूळ या ठिकाणी विक्रीसाठी आणण्यात आला होता. त्यापैकी साडेनऊ हजार क्विंटल तांदळाची विक्री झाली असून या माध्यमातून सुमारे साडेतीन कोटींची उलाढाल झाली. या महोत्सवामध्ये वाडा कोलम आणि मुरबाड झिनी या तांदळाला सर्वाधिक मागणी होती. या तांदळाची सुमारे सहा हजार क्लिंटल विक्री झाली. तर अवेळी पावसामुळे सुमारे एक हजार क्विंटल माल पुन्हा परत न्यावा लागला, अशी माहिती ठाण्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महावीर जंगटे यांनी दिली.
वाडा, मुरबाड आणि जव्हारसारख्या ग्रामीण भागाची ओळख असलेल्या कोलम, झिनी आणि दप्तरी या तांदळाच्या वाणाला ठाण्यातील तांदूळ महोत्सवामध्ये उत्साही प्रतिसाद लाभला. आकाराने बारीक असलेला आणि उत्तम चवीसाठी ओळखला जाणाऱ्या या तांदळावर ग्राहकांच्या उडय़ा पडल्या. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी तांदळाची मोठी खरेदी झाली असली तरी रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त पकडून खरेदीसाठी जाणाऱ्या ग्राहकांना मात्र अवकाळी बरसलेल्या पावसाचा फटका सहन करावा लागला. पावसामुळे ग्राहकांची गर्दी आटल्याचे चित्र रविवारी दिसत होते. तीन दिवसांमध्ये वाडा कोलमची सर्वाधिक विक्री झाली तर त्याखालोखाल मुरबाड झिनीची विक्री झाली. जव्हारचा तांदूळ असलेल्या दप्तरीची तिसऱ्या क्रमांकावर होता, तर गुजराथ ११ या वाणाची सुद्धा मोठी खरेदी झाली.

सोनम, करीनाची मागणी घटली
सोनम आणि करीना या नावांना हिंदी चित्रपटसृष्टीत कमालीचे महत्त्व असले तरी तांदूळ महोत्सवात मात्र या नावाच्या तांदळाकडे ग्राहकांनी सपशेल पाठ फिरवली. चवदार आणि आकाराने मध्यम असलेल्या या दोन वाणांची निर्मिती खासगी स्वरूपात झाली असून या तांदळाला पुरेसी मागणी या महोत्सवात नव्हती. याशिवाय रूपाली, अश्विनी मयूर या खासगी वाणांची विक्रीही किरकोळ स्वरूपात झाली.

तांदूळ महोत्सव फायद्याचाच..  
अवेळी आलेल्या पावसाने तांदूळ महोत्सवाचा प्रतिसाद घटवला असला तरी तांदूळ महोत्सव हा शेतकऱ्यांसाठी फायद्याचाच ठरला आहे. व्यापारी आणि दलालांच्या तावडीतून सुटल्यामुळे शेतकऱ्यांना यावर २० टक्के फायदा झाला तर ग्राहकांनासुद्धा २० टक्के कमी किमतीमध्ये हे तांदूळ उपलब्ध होऊ शकले. मागील वर्षी ८ हजार क्विंटल तांदळाची विक्री झाली होती. यंदा यामध्ये वाढ होऊन ही विक्री साडेनऊ हजार क्विंटलच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे पावसामुळे विक्री कमी झाली असली तरी तांदूळ महोत्सव फायदेशीर असाच होता, असे मत महावीर जंगटे यांनी व्यक्त केले.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2015 12:28 pm

Web Title: rice festival in thane get tremendous response
Next Stories
1 मुजोर रिक्षाचालकांचा धंदा ‘बस’ला
2 ठाणे शहरबात : ठाण्यापल्याड प्रभू प्रमाद!
3 आठवडय़ाची मुलाखत : उद्योगांना सतत धोपटणे बंद करा
Just Now!
X