X

धनाढय़ विकासकांचा पालिकेला ‘चुना’

दरवर्षी मालमत्ता करातून पालिकेला सुमारे ३०० ते ३५० कोटींचा महसूल मिळतो.

१९ कोटी ६० लाखांचे धनादेश बँकेतून परत

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील ७४७ विकासकांनी गेल्या दोन वर्षांत पालिकेकडे जमा केलेले तब्बल १९ कोटी ६० लाखांचे धनादेश न वटल्याचे समोर येत आहे. बांधकाम परवानगी, ना हरकत दाखले तसेच अन्य करांच्या भरण्यासाठी पालिकेकडे जमा करण्यात आलेले हे धनादेश परत आल्याने पालिकेच्या अपेक्षित महसुलावर पाणी फिरले आहे.

गेल्या ३० वर्षांपासून विकासक, मालमत्ताधारकांकडे पालिकेची मालमत्ता, मुक्त जमीन कराची सुमारे ५५० कोटी रुपयांची थकबाकी आहे. न्यायालयीन दावे, मालमत्तांमधील वादामुळे ही वसुली होत नसल्यामुळे पालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. दरवर्षी मालमत्ता करातून पालिकेला सुमारे ३०० ते ३५० कोटींचा महसूल मिळतो. चालू वर्षांच्या करातील काही रक्कम मालमत्ताधारक, विकासक धनादेशाने पालिकेकडे जमा करतात. उर्वरित रकमेचे धनादेश ३१ मार्चनंतरच्या तारखेचे देतात. त्यापैकी बरेचशे धनादेश वटतच नाहीत. १९८३ पासून ते आजतागायत हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे पालिकेचे खूप नुकसान झाले आहे. धनादेश न वटणाऱ्या ७४७ मालमत्ताधारकांपैकी अनेक नामांकित विकासकांसह भाजपच्या एका नगरसेवकाचाही समावेश आहे.

न वटलेल्या धनादेशांची प्रभागनिहाय रक्कम

* अ प्रभाग – १२४ थकबाकीदार, ९ कोटी ९९ लाख ७५ हजार रुपये.

*  ब प्रभाग – १२२ थकबाकीदार, ६ कोटी ६५ लाख ९१ हजार रुपये.

* क प्रभाग- १०० थकबाकीदार, एक कोटी १० लाख ९९ हजार धनादेश रुपये.

* ड प्रभाग- १५१ थकबाकीदार, एक कोटी ४० लाख रुपये.

* ई प्रभाग- ४५ थकबाकीदार, १७ लाख रुपये.

* फ प्रभाग – ४५ थकबाकीदार, ७३ लाख रुपये.

* ग प्रभाग- १५ थकबाकीदार, १४ लाख रुपये.

* ह प्रभाग- ३३ थकबाकीदार, ६२ लाख रुपये.

*  आय प्रभाग- ६ थकबाकीदार, एक लाख १३ हजार रुपये.

* जे प्रभाग- ६ थकबाकीदार, २५ हजार रुपये.

न वटलेल्या धनादेश मालमत्ताधारकांना ५५० नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. याशिवाय इतर दंडात्मक रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

– विनय कुळकर्णी, कर निर्धारक संकलक