कल्याणमधील गौरीपाडा येथे राहणारे रिक्षाचालक नरेश कर्णिक (५०) यांना बेदम मारहाण करून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एका बाल गुन्हेगाराचा समावेश आहे.
अजय भोईर (रा. बेतवडे, दिवा), योगेश डायरे (रा. मोरेश्वर पार्क, तिसगाव), अक्षय माळी (जयराम निवास, तिसगाव), रोहन शिंदे (चक्कीनाका) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. रोहन हा बाल गुन्हेगार आहे. हे सगळे तरुण १८ ते २२ वयोगटातील आहेत. हे तरुण दोन मोटारसायकलवरून रस्त्याच्या मध्य भागातून चालले होते. याचवेळी खडकपाडा येथून नरेश कर्णिक प्रवासी भाडे घेऊन रिक्षेने बेतुरकरपाडा दिशेने जात होते. मोटार सायकलस्वारांना भोंगा वाजवूनही ते कर्णिक यांना रिक्षा पुढे जाऊ देण्यास सहकार्य करीत नव्हते. कर्णिक यांनी मुश्किलीने रिक्षा पुढे काढली. मोटार सायकलस्वारांना रस्त्याच्या बाजूने वाहन चालवा अशी सूचना केल् याने कर्णिक यांना अडवून त्यांना बेदम मारहाण केली. त्यात कर्णिक गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर गेले १५ दिवस शीवच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू होते. तीन दिवसापूर्वी त्यांचे निधन झाले.
पत्नी पूनम कर्णिक यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.