कठोर परिश्रम, आर्थिक परिस्थितीवर मात करीत डोंबिवलीतील एका रिक्षाचालकाच्या मुलाने सनदी लेखापाल होण्यापर्यंत मजल मारली आहे. रिक्षा चालकाच्या मुलाने हे यश संपादन केल्याने या गुणवान मुलाचा कल्याणचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाला साहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेश सरक, मोटार वाहन निरीक्षक संदीप निमसे, सचिन कोतापकर, अजय कराळे, मुलाचे वडील नरेंद्र दुबे, रिक्षा संघटनेचे शेखर जोशी, उदय शेट्टी उपस्थित होते. प्रामाणिकपणा, निष्ठेने आपण आपले कर्तव्य पार पाडले तर त्याची फळे मुलांना चाखायला मिळतात. मागील चाळीस र्वष नरेंद्र दुबे यांनी परप्रांतामधून येऊन रिक्षा व्यवसाय सुरू केला. या प्रामाणिकपणातून, कष्टातून जी पुंजी मिळाली ती मुलाच्या उत्कर्षांसाठी कामी आली. प्रत्येक रिक्षाचालकाने निष्ठेने व्यवसाय करून आपल्या कुटुंबीयांच्या उत्कर्षांचा विचार करावा, असे प्रतिपादन नंदकिशोर नाईक यांनी यावेळी केले.
डोंबिवलीतील उमेशनगरमधील नागो म्हात्रे चाळीत नरेंद्र दुबे यांचे कुटुंब राहते. या चौकोनी कुटुंबातील सचिन दुबे (२५) हा एक सदस्य. नवापाडय़ातील पी. एम. केनिया शाळेत त्याने दहावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर बी. कॉम. के. व्ही. पेंढरकर महाविद्यालय, एम. कॉम. मॉडेल महाविद्यालयातून पूर्ण केले. प्रत्येक वर्षी सचिनने प्रथम श्रेणी मिळवली. चाळीतील खोली, परिसरातील वातावरण याच्याशी मिळतेजुळते घेत स्वसामर्थ्यांने सचिनने कंपनी सेक्रेटरी, सनदी लेखापाल होण्यापर्यंत मजल मारली.