प्रवाशांकडून मनमानी भाडेवसुली, वाहतूक बेशिस्तीवर वचक नाहीच

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील परिसरात रिक्षा थांबा सोडून बाहेरील रस्त्यावर उभे राहणाऱ्या रिक्षाचालकांकडून जास्त भाडे आकारून प्रवाशांची लूटमार केली जात असल्याच्या तक्रारींनंतर वाहतूक पोलिसांनी शनिवार आणि रविवारी कारवाई केली. मात्र पोलिसांची कारवाई थंडावताच मुजोर रिक्षाचालक पुन्हा एकदा बेशिस्त वर्तन करू लागले आहेत. स्थानक परिसरात सोमवारी हे चित्र दिसून आल्याने पोलिसांच्या कारवाईवरच आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

ठाणे पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. रेल्वे स्थानकाबाहेरच सॅटीस पुलाखाली रिक्षांचा तर सॅटीस पुलावर बस थांबा आहे. रिक्षा आणि बस थांब्यावर दिवसभर प्रवाशांची मोठी गर्दी असते. मात्र, याच परिसरात थांब्याबाहेर काही रिक्षाचालक आपल्या रिक्षा उभ्या करतात व रांगेत उभ्या प्रवाशांना हाक मारून प्रवासाबाबत विचारणा करतात. घाईत असलेले प्रवासी रांग सोडून अशा रिक्षांकडे जातात. मात्र, हे रिक्षाचालक प्रवाशांकडून मनमानी भाडेवसुली करतात. याबाबत काही प्रवाशांनी ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्याकडे तक्रारी केल्यानंतर विचारे यांनी वाहतूक पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्यासह स्थानक परिसराचा दौरा केला. तसेच मनमानी भाडेआकारणी करणाऱ्या रिक्षाचालकांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

खासदारांच्या दौऱ्यानंतर स्थानक परिसरात वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले व या पोलिसांकडून बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईही करण्यात आली. गेल्या आठवडय़ात शनिवारी व रविवारी ही कारवाई करण्यात आली. त्यावेळी रिक्षाचालकांच्या मनमानीला चाप बसल्याचे दिसून आले. मात्र, सोमवारपासून परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ झाली आहे.

यासंदर्भात वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्याशी संपर्क केला असता, त्या ठिकाणी कारवाई करण्यासाठी पोलीस कर्मचारी तात्काळ पाठविण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

अवाजवी भाडे आकारणी

सॅटीस पुलाखाली असलेल्या रिक्षा थांब्यावरून मीटर पद्धतीने रिक्षा चालविण्यात येतात. मात्र, लांबचे भाडे मिळावे यासाठी रिक्षाचालक थांब्यावर उभे राहात नाहीत. ते थांबा सोडून काही अंतरावर रिक्षा उभ्या करतात. यामुळे येथील वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. घोडबंदर येथील हिरानंदानी किंवा मानपाडा भागात जाण्यासाठी रिक्षाचे ६० ते ७० रुपये इतके भाडे मीटरद्वारे होते. मात्र, थांब्याबाहेर उभे राहणारे रिक्षाचालक प्रवाशांकडून १०० ते १२० रुपये घेतात. मीरा-भाईंदर येथील प्रवासासाठी प्रवाशांकडून ५०० ते ७०० रुपये घेतले जातात, अशी माहिती सूत्रांनी दिली.