प्रवाशांना भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांची मुजोरी ठाणेकरांसाठी नवी नाही. रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांसोबत उद्दामपणे वागणारे रिक्षाचालक शेकडोंनी सापडतील. मात्र ठाणे शहराच्या पश्चिमेकडे उभ्या राहिलेल्या मोठाले आय.टी. पार्क तसेच बडय़ा मॉलपर्यंत जाण्यासाठी ठाण्याबाहेरून येणाऱ्या प्रवाशांना गंडा घालणारी रिक्षाचालकांची टोळी सक्रीय झाली आहे. वागळे इस्टेट परिसरातील पासपोर्ट कार्यालय, आय.टी. पार्क, कोरम तसेच विवियाना मॉलपर्यंत सोडण्यासाठी १५० ते २०० रुपयांचा ‘घाऊक दर’ आकारला जात आहे.
वागळे इस्टेट भागात असलेले नवे पासपोर्ट कार्यालय तसेच याच भागातील आयशर आयटी पार्क, दोस्ती पिनॅकल यासारख्या भागात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. येथे जाण्यासाठी ठाणे परिवहन उपक्रमाच्या बसगाडय़ा उपलब्ध असल्या तरी त्यांची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे प्रवाशांना रिक्षाचा आधार घ्यावा लागतो. अशा वेळी ठाण्याबाहेरील परिसरातून आलेल्या प्रवाशांना हेरून त्यांच्याकडून मनमानी भाडे वसूल करणारी रिक्षाचालकांची टोळीच सक्रीय झाली आहे. ठाणे रेल्वे स्थानकापासून वागळे इस्टेटचा परिसर फार तर तीन ते चार किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. या भागात जाण्यासाठी मीटरने ४० ते ५० रुपये भाडे होते. मात्र हा परिसर दूर असल्याचे भासवून रिक्षाचालक नवख्या प्रवाशांकडून १०० ते १५० रुपये आकारतात. त्याचप्रमाणे आनंदनगर चेकनाका परिसरात मुंबईच्या हद्दीतून वागळे भागातील आयटी पार्कमध्ये जाणाऱ्या प्रवाशांचीही अशीच लूट सुरू असते.
ठाण्यातील विवियाना, कोरम अशा प्रसिद्ध मॉल्समध्ये येणाऱ्या ग्राहकांत नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली येथील कुटुंबांची संख्या लक्षणीय आहे. अशा प्रवाशांना गंडवून मीटरऐवजी अवास्तव ‘घाऊक’ भाडे आकारण्यात येत आहे. शेअर रिक्षांची भाडे आकारणी मोडून काढत थेट घाऊक दरांचा हा नवा ‘पॅटर्न’ प्रवाशांचा खिसा कापू लागला आहे. याप्रकरणी ठाण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी यासंबंधीच्या कोणत्याही तक्रारी हेल्पलाइनवर प्राप्त झालेल्या नाहीत, अशी माहिती दिली.
प्रवाशांच्या लुटीचे थांबे
*मुलुंड चेकनाका
*आनंदनगर जकातनाका
*माजिवाडा उड्डाणपुलाजवळ
*सॅटिस पुलाखाली