गरजू महिलांना दिलेल्या रिक्षा दोन महिन्यांनंतरही पालिकेच्या आवारात

महिलादिनाचे औचित्य साधून मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाने गरजू महिलांना केलेले रिक्षांचे वाटप निव्वळ देखावा असल्याचे उघड होत आहे. वाटप केलेल्या रिक्षा दोन महिन्यांनंतरही महापालिकेच्याच आवारात धूळ खात उभ्या आहेत. विशेष म्हणजे, महिलादिनाच्या दिवशी ज्या महिलांना रिक्षांचे वाटप करण्यात आले, त्या महिलांची या योजनेसाठी अद्याप अधिकृत निवडच झाली नसल्याचे स्पष्ट होत आहे.

मीरा-भाईंदर शहरातील गरजू महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी त्यांना रिक्षा देऊन रोजगाराचे साधन देण्याची घोषणा महापौर डिंपल मेहता यांनी केली होती. यासाठी शहरातील १०० महिलांची निवड करण्याचेही जाहीर करण्यात आले होते. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात दहा महिलांना रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना महिलादिनी रिक्षावाटप करण्याचे ठरले. त्यानुसार अत्यंत गाजावाजा करत रिक्षांचे वाटपही करण्यात आले. मात्र, हा कार्यक्रम संपताच संबंधित महिलांकडून रिक्षांच्या चाव्या परत घेण्यात आल्या. तेव्हापासून आतापर्यंत या रिक्षा महापालिकेच्या आवारातच उभ्या आहेत.

ज्या दहा महिलांना रिक्षावाटप करण्यात आले. त्यांना रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले असले तरी, रिक्षावाटप करण्यासाठी त्यांची अधिकृतपणे निवडच झालेली नाही. दुसरीकडे, या योजनेवर महापालिकेने किती खर्च करायचा व लाभार्थी महिलांकडून किती रक्कम वसूल करायची, यावर अद्याप निर्णयच होऊ शकलेला नाही. पालिकेच्या ताब्यात असलेल्या दहा रिक्षांसाठी प्रत्येकी पावणेदोन लाख याप्रमाणे पालिकेने सुमारे साडेसतरा लाख रुपये खर्च केले आहेत.

या योजनेअंतर्गत वाटण्यात येणाऱ्या १०० रिक्षांसाठी पूर्ण अनुदान देण्याची महापालिका प्रशासनाची तयारी नाही. पालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असताना केवळ १०० महिलांच्या रोजगारासाठी दोन कोटी रुपये खर्च करण्याची ऐपत नसल्याची भूमिका पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली होती. तसेच जाहिरात प्रसिद्ध करून व प्रस्ताव मागवूनच लाभार्थी निवडले जावेत, अशी भूमिकाही या अधिकाऱ्यांनी मांडली होती. मात्र, महिलादिनी आपल्या कामाचा देखावा निर्माण करण्यासाठी ही प्रक्रिया न राबवताच दहा महिलांना रिक्षावाटप करण्यात आले. आता या महिलांची निवड अंतिम नसल्याने या दहा रिक्षाही कार्यालयातच उभ्या आहेत.