ठाण्यात राहणाऱ्यांना त्यांच्या लोकप्रतिनिधींकडून काय मिळाले, असा साधा सरळ प्रश्न विचारला तर बहुतांश ठाणेकर ‘रिक्षाची शिक्षा’ असे उत्तर देतील. ठाणे रेल्वे स्थानकापासून शहराच्या कोणत्याही भागात जाण्यासाठी रिक्षा पकडायची म्हटली की, जो त्रास सहन करावा लागतो, तो त्रास एखाद्या शिक्षेपेक्षा कमी नाही. कळवा शहरात याहूनही भयाण चित्र आहे. एकीकडे टीएमटीची बससेवा केवळ नावापुरतीच धावते, तर दुसरीकडे रिक्षा मिळेलच अशी खात्री नाही. अशा परिस्थितीमुळे हवालदील झालेल्या ठाणेकर प्रवाशांसाठी एकमेव दिलासादायक गोष्ट म्हणजे मुंबईच्या ‘बेस्ट’ उपक्रमाची बससेवा.
ठाणे रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यानंतर पश्चिमेकडे रिक्षासाठी लागणारी प्रवाशांची रांग पाहिली की आगीतून फुफाटय़ात पडल्याची जाणीव होते. दहा मिनिटांच्या रिक्षा प्रवासासाठी तासभर रांगेत तिष्ठत राहावे लागते. त्यातही रिक्षाचालकांची मनमानी असतेच. अनेक रिक्षाचालक खुशाल रांगेतून बाहेर पडून लांबच्या भाडय़ांना खुणावत असतात. हे सगळं नियम डावलून चाललेलं असतं. तेही समोरच असलेल्या पोलीस चौकीतील शिलेदारांच्या नजरेदेखत. बऱ्याचदा तर हे ‘बाहेरचे’ रिक्षाचालक रांगेतल्या रिक्षाचालकांची अडवणूक करत असल्याचेही दिसून येते. रांगेतल्या रिक्षांचा रस्ता अडवला जाईल, अशा ठिकाणी रिक्षा उभी करणे, फलाटाजवळ जाऊन बाहेर पडणाऱ्या प्रवाशांच्या मागे भुणभुण लावणे असे उद्योग येथे सर्रास सुरू असतात. त्यामुळे रिक्षाथांब्याकडे येण्याचा अन्य रिक्षाचालकांचा मार्गच बंद होतो. इकडे प्रवासीही रिक्षाच्या प्रतीक्षेत ताटकळत उभे असतात. ही कोंडी कशी फुटणार, हा आजवर न सुटलेला (भविष्यातही सुटण्याची शक्यता नसलेला?) प्रश्न आहे. मात्र, अशा रिक्षाचालकांवर कारवाई होणार की नाही, हा प्रश्न ठाणेकर विचारू शकतात की नाही?
रिक्षाचालकांनाही त्यांच्या समस्या आहेत, हे खरे आहे. ठाण्यात सीएनजी पंपांची संख्या कमी आहे. त्यामुळे ऐन सायंकाळी रिक्षांची रांग सीएनजी पंपांवर लागलेली असते. आधीच प्रवाशांच्या संख्येपेक्षा रिक्षांची संख्या कमी आहे. त्यातच सीएनजीसाठीच्या रांगेतच बऱ्याच रिक्षांचा वेळ जात असल्याने प्रवासी आणि रिक्षाचालक दोघांचीही कोंडी होते.
ठाणे शहर आता घोडबंदर आणि मुंब्य्रापर्यंत पसरले आहे. शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा सक्षम पर्याय असणे आवश्यक आहे. अशी व्यवस्था उभारण्यात ठाणे परिवहन उपक्रमाच्या बससेवेला कधीच अपयश आले आहे. मोडक्या जुनाट भंगार बसगाडय़ांनिशी परिवहनचा कारभार सुरू आहे. या बस वेळेत येणार नाहीत, याची कोणीही खात्री देऊ शकेल. त्यापेक्षा ‘बेस्ट’ची बससेवा ठाणेकरांना आपलीशी वाटते. ठाण्यातल्या ठाण्यात जायचे असले तरी बेस्टच्या बसची वाट बघणे प्रवाशांना परवडते. ठाण्याच्या कोणत्याही भागातून सकाळी रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचणे अतिशय आव्हानात्मक आहे. आता शेअर रिक्षाचा पर्याय आहे. पण त्यासाठीची रांग पाहूनच धास्ती वाटते. हा प्रश्न एका दिवसात सुटणारा नाही. रिक्षांची संख्या वाढली पाहिजे, रिक्षाचालकांना शिस्त लागली पाहिजे आणि वाहतुकीचे योग्य नियोजन झाले पाहिजे. हे करणे कठीण नाही. ठाण्याची लोकसंख्या आणि विस्तार वाढतच चालला आहे. अशा परिस्थितीत शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत राज्यकर्त्यांनी आणि प्रशासनाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. ते सध्या तरी होताना दिसत नाही. पुढेही असेच राहिले तर रिक्षा नावाची शिक्षा ठाणेकरांना चुकवता येणार नाही.