ठाणे स्थानक परिसरात रिक्षाचालकांना झालेल्या मारहाणप्रकरणी सात दिवसांचा कालावधी देऊनही महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि त्यांच्या अंगरक्षकांविरोधात गुन्हा दाखल झाला नसल्यामुळे गुरुवारी (आज) रिक्षा-टॅक्सी बंदचे आंदोलन संघटनांनी पुकारले आहे. शिवसेनाप्रणीत एकता, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि विजू नाटेकर यांच्यासह १३ प्रमुख संघटनांनी बंदला पाठिंबा दिला आहे. तसेच ठाणे शहरापुरतेच हे आंदोलन मर्यादित राहणार नसून कळवा-मुंब्य्रातील रिक्षा संघटना बंदमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे ठाणे, कळवा, मुंब्रा शहरातील प्रवाशांचे रिक्षा बंदमुळे हाल होण्याची चिन्हे आहेत.

दोन आठवडय़ांपूर्वी ठाण्यातील गावदेवी परिसरात फेरीवाल्यांविरोधात कारवाई करताना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि त्यांच्या अंगरक्षकांनी रिक्षाचालकांना मारहाण केली होती. या मारहाणप्रकरणी आयुक्त जयस्वाल आणि त्यांच्या अंगरक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी सात दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. मात्र त्यानंतरही पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला नसल्यामुळे गुरुवारी रिक्षा-टॅक्सी बंदचे आंदोलन पुकारण्यात आले आहे, अशी माहीती रिक्षाचालक संघटना कृती समितीचे सदस्य राज राजापूरकर यांनी दिली.

रिक्षाचालकांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ गुरुवारी सकाळी गावदेवी ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आयुक्त जयस्वाल आणि त्यांच्या अंगरक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येणार आहे. शिवसेनाप्रणीत एकता, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि विजू नाटेकर यांच्यासह १३ प्रमुख संघटनांनी बंदला पाठिंबा दिला आहे. तसेच कळवा-मुंब्य्रातील रिक्षा संघटना बंदमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे ठाण्यासह कळवा-मुंब्रा भागातही रिक्षा बंद राहणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

नोकरदारवर्गाला फटका

ठाणे शहरातील अंतर्गत वाहतुकीसाठी महापालिकेची परिवहन सेवा आहे. परंतु परिवहनच्या ताफ्यात पुरेशा बसगाडय़ा नसल्यामुळे अनेक प्रवासी रिक्षा तसेच खासगी बसने प्रवास करतात. परंतु ठाणे पूर्व स्थानक ते घोडबंदर मार्गावर बेकायदा धावणाऱ्या खासगी बसगाडय़ाही बंद झाल्या आहेत. त्यामुळे खासगी बसचे प्रवासी पुन्हा शेअर रिक्षांकडे वळले आहेत. शहराच्या दूरवर असलेल्या भागांतून स्थानकापर्यंत शेअर रिक्षा चालविण्यात येत असून या रिक्षांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. गर्दीच्या वेळेत या रिक्षांना मोठी मागणी असते. त्यामुळे रिक्षा बंदचा फटका सकाळी कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गाला बसणार आहे.