News Flash

१०० फुटी ध्वजाने भाजप-शिवसेनेत फूट

अंबरनाथ पूर्वेच्या हुतात्मा चौकात पालिकेने राष्ट्रध्वज उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. या राष्ट्रध्वजाची उंची तब्बल १०० फूट असणार आहे.

| March 4, 2015 12:09 pm

अंबरनाथ पूर्वेच्या हुतात्मा चौकात पालिकेने राष्ट्रध्वज उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. या राष्ट्रध्वजाची उंची तब्बल १०० फूट असणार आहे. राष्ट्रभक्तीचे प्रतीक म्हणून ध्वज तरुणांच्या सतत डोळ्यांसमोर राहावा, असा उद्देश या उभारणीमागे असल्याचे समजते. यात महत्त्वाची बाब म्हणजे या ध्वजासाठी ८० लाखांचा खर्च पालिकेला करावा लागणार असून यासंबंधीच्या ठरावाला महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा देत मंजुरी दिली आहे. हुतात्मा चौकात या प्रकल्पाचे कामही सुरू झाले असून सहा रस्ते एकत्र येणाऱ्या या चौकाच्या मधोमध हा ध्वज उभारण्यात येणार असून त्याच्या दोन्ही बाजूस आसनव्यवस्था करण्यात येणार आहे. याबाबत शहर भाजपमध्ये नाराजी पसरली असून त्यांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे.
 १५ ऑगस्ट व २६ जानेवारीलाही पालिकेचे नगरसेवक उपस्थित नसतात. मग आता निवडणुका तोंडावर आल्या असताना पालिकेची राष्ट्रभक्ती जागृत झाल्याचा आरोप शहर भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे या राष्ट्रध्वजाच्या उभारणीवरून सेना व भाजपमध्ये नव्याने वाद उफाळून आला आहे. हे चौक सुशोभीकरण नसून हा केवळ पैसे कमविण्याचा उद्योग आहे. शहर आता मोठे होत जात आहे. त्यामुळे अनेक चौक शहरात निर्माण झाले आहेत. अशा वेळी हे चौक सुशोभित करायचे सोडून आहे तेच चौक पैसे कमावण्याच्या हेतूने सुशोभित करण्याचा हा प्रकार आहे. या शब्दांत भाजप शहर अध्यक्ष विजय खरे यांनी या प्रकल्पाची थट्टा केली. दरम्यान, भरचौकात मधोमध उभारल्या जाणाऱ्या या राष्ट्रध्वजामुळे वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. याबाबत पालिकेने याबाबत पत्र पाठविले असले तरी अद्याप प्राप्त झालेले नाही. त्यावर लवकर निर्णय कळविण्यात येईल. अशी माहिती अंबरनाथ वाहतूक नियंत्रण उपशाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत नगराळे यांनी दिली. तर, योग्य त्या परवानग्या घेऊन हा प्रकल्प उभा करत असून यासंबंधी पालिकेच्या महासभेत ठरावदेखील संमत झाला आहे. तरुणांमध्ये जाज्वल्य राष्ट्रभक्ती निर्माण व्हावी या उद्देशाने हा प्रकल्प राबवत असल्याचे नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी सांगितले.

युतीवर परिणाम होणार?
अंबरनाथमध्ये शिवसेना व भाजपमध्ये पालिका निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर वाद वाढत असून त्याचे परिणाम निवडणुकीत होणाऱ्या युतीवर होणार आहेत. नुकतीच भाजप नेत्यांनी अंबरनाथमध्ये येऊन पालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याची भाषा केली होती. तर, सेनेचे स्थानिक नेतेही जाहीर कार्यक्रमात स्वबळाचीच तयारी करण्याचे आदेश देत आहेत. त्यामुळे अशा वादांच्या पाश्र्वभूमीवर अंबरनाथमध्ये पालिका निवडणुकीत युती होण्याची शक्यता मावळत चालली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2015 12:09 pm

Web Title: rift between bjp shiv sena
टॅग : Bjp,Shiv Sena
Next Stories
1 बदलापुरात अवैध रिक्षा थांब्यामुळे वाहतूक कोंडी
2 आंतरराष्ट्रीय संशोधक पत्रिकांचे दालन खुले
3 घरगुती गॅससाठी आधारकार्डची ग्राहकांना सक्ती
Just Now!
X