मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचा धोका कायम

कल्पेश भोईर, लोकसत्ता

वसई : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत अवजड वाहने, विश्रांतीसाठी उभ्या राहणाऱ्या इतर खासगी वाहनांनासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यावतीने सेवा रस्ता तयार करण्यात येणार होता, मात्र सेवारस्ता तयार करण्यासाठी जागा मिळत नसल्याने तो महामार्ग विकास आराखडय़ातून रद्द करण्यात आल्याची माहिती प्राधिकरणाने दिली.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हा सर्वात जास्त वर्दळीचा असूनही महामार्गावरील प्राथमिक सोयीसुविधांची पूर्तता न केल्याने वाहनचालकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.

वसई तालुक्यातून हा महामार्ग जात असल्याने महामार्गालगतच्या अनेक गावांना त्याचा फटका बसतो.  प्राथमिक सोयीसुविधांअभावी या मार्गावर नागरिकांची गैरसोय होत आहे. राष्ट्रीय महामार्गावर  दुतर्फा  सेवा रस्ता (सर्विस रोड) असणे आवश्यक आहे. सेवा रस्ता तयार करण्यात यावा, यासाठी  अनेक वेळा नागरिकांनी महामार्ग प्राधिकरणाकडे तक्रारी केल्या आहेत. यानुसार महामार्ग विकास आराखडय़ात ६० किलोमीटर लांबीचा सेवा रस्ता विविध ठिकाणी मिळून पूर्ण करण्यात येणार होता. यासाठी मध्यंतरी रस्त्याच्या दुतर्फा सेवा रस्ता बनविण्याचे कामही प्राधिकरणाने हाती घेतले होते. ज्या ठिकाणी सेवा रस्ता बनविण्यासाठी जागा उपलब्ध झाली, अशा ठिकाणी सेवा रस्ते तयार करण्यात आले आहेत, मात्र इतर ठिकाणी सेवा रस्ता बनविण्यासाठी जागाच उपलब्ध होत नसल्याने अखेर हा सेवा रस्ता विकास आरखडय़ातून रद्द करावा लागला असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व्यवस्थापक दिनेश अग्रवाल यांनी सांगितले आहे. त्यामुळे अद्यही  घोडबंदर ते चारोटी टोल नाका या भागात अद्यापही सेवा रस्ता तयार करण्यात आलेला नाही.

त्यामुळे विश्रांतीसाठी वाहने ही थेट महामार्गावर उभी केली जात आहेत. रात्रीच्या सुमारास अंधारामुळे वाहने दिसून येत नाहीत  त्यामुळे भरधाव वाहनांना अडथळा निर्माण होऊन अपघात होण्याची शक्यता असल्याचे वाहनचालकांनी सांगितले आहे, तर या अशा प्रकारे वाहने उभी केली जात असल्याने रस्ताही अरुंद  होऊन वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. ही समस्या आता अधिक जटिल बनू लागली आहे ही समस्या सोडवण्यासाठी सेवा रस्त्याची गरज आहे मात्र सेवा रस्ता जागेअभावी रद्द झाल्याने महामार्गावरील समस्यामध्ये अधिक भर पडण्याची शक्यता असल्याचे वाहनचालकांनी सांगितले.

अतिक्रमणे

महामार्ग प्राधिकरणाने सेवा रस्ता तयार करण्यासाठी जागा मिळत नसल्याचे कारण देत सेवा रस्ताच रद्द केला आहे. असे जरी असले तरी महामार्गालगत मोठय़ा प्रमाणात अतिक्रमणे झालेली आहेत. हॉटेल तसेच गॅरेजेसने महामार्गावर अतिRमण केले आहे. हे अतिनमण वाहतूक कोंडी आणि अपघाताला कारणीभूत ठरत असतात. भूमाफिया तसेच हॉटेल चालकांनी महामार्गालगत भराव टाकून अतिक्रमण केलेले आहे, मात्र अतिRमण करणाऱ्यांना केवळ प्राधिकरणाने नोटिसा बजावल्या असल्याचे उत्तर दिले आहे.

बंद वाहने रस्त्यावरच

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठवर तांत्रिक बिघाडामुळे अनेकवेळा वाहने ही महामार्गावरच बंद पडतात ही बंद पडलेली वाहने हटविण्यासाठी प्राधिकरणाची कोणतीही सुविधा तात्काळ उपलब्ध होत नसल्याने वाहने रस्त्याच्या मध्येच उभी करून दुरुस्त करावी लागत आहेत त्यामुळे मागून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांनी धडक होऊन मोठा भीषण अपघात होण्याची शक्यता आहे. तर या बंद वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते जर जवळपासच्या अंतरावर वाहने हटविण्यासाठी क्रेनची सुविधा उपलब्ध केली तर वाहन बाजूला केले जाऊ शकते.