भगवान मंडलिक

मुख्य रस्त्याजवळ ज्वालाग्राही भंगार साहित्याचा साठा

वाहतूक कोंडीमुळे बदनाम झालेल्या शिळफाटा रस्त्याच्या दुतर्फा अवजड भंगार साहित्य टाकले जात आहे. ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेतून वगळण्यात आलेल्या १४ गावांच्या वेशीवर रसायन वाहतुकीच्या टाक्या, भंगार बॉयलर, बंद पडलेल्या कंपन्यांमधील सुटय़ा भागांची बेकायदा गोदामे उभी राहू लागली आहेत. महापालिका आणि जिल्हा प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. ज्वलनशील साहित्याची बेकायदा साठवण होत असून त्यासंदर्भातील तक्रारी पुढे येत आहेत.

शिळफाटा दत्त मंदिर चौकातून पनवेलच्या दिशेने जाताना दहिसर-मोरी, पिंपरी गावांच्या हद्दीत शिळफाटा मुख्य रस्त्याजवळ दोन्ही बाजूंना कंपन्यांमधील टाकाऊ भंगार, बॉयलर, कंटनेर, फ्रिजर, रसायन वाहतुकीच्या टाक्या, बंद पडलेल्या कंपन्यांमधील सुट्टे भाग आणून टाकले आहेत. रस्त्याच्या एका कोपऱ्यावर हे भंगार साहित्य तोडण्याचे काम केले जाते. एखादा बॉयलर किंवा कंपनीचा सुटा भाग कापताना किंवा तोडताना स्फोट झाला आणि दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण, असे प्रश्न या भागातील काही रहिवाशांकडून केले जात आहेत.

शिळफाटय़ाहून पनवेलकडे जाताना उजव्या बाजूला उभारलेली भंगार साहित्याची दुकाने ही वन जमिनीवर आहेत, असे या भागातील रहिवाशांचे म्हणणे आहे. भंगार साहित्य वाढेल, तशी ही दुकाने वाढवली जातात. वन विभागाची जमीन असल्याने दुकानाचा भाग वाढविला तर हरकत घ्यायला कोणी नसते. त्यामुळे भंगार व्यावसायिकांचे फावले आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यांनी तशा तक्रारीही केल्या आहेत. जमीन वन विभागाची असली तरी या व्यावसायिकांकडून काही ग्रामस्थ भाडे म्हणून दरमहा पैसे वसूल करतात. काही जमिनी स्थानिक ग्रामस्थांच्या मालकीच्या आहेत. त्यांनी त्या व्यावसायिकांना भाडय़ाने दिल्या आहेत. ते या व्यावसायिकांकडून रग्गड भाडे वसूल करतात, असे ग्रामस्थांनी सांगितले.

शिळफाटा चौक येण्यापूर्वीच दहिसर-मोरी, पिंपरीच्या दिशेने चौकात वाहने थांबल्याने वाहतूक कोंडी होते. काही वाहनचालक रस्त्याच्या बाजूच्या पट्टीवरून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. मध्येच भंगाराच्या साहित्याचा अडसर असल्याने ती वाहने अडकून पडतात. या रस्त्यावरील वाहनांची चौथी रांग भंगार साहित्याला खेटून असते. अर्धा तास एका जागी खिळून राहिलेल्या वाहनांमधील काही चालक रस्ता दुभाजकामधून मार्ग काढून चुकीच्या मार्गिकेतून शिळफाटा चौकात जाऊन तेथून कल्याण दिशेने जाण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी तेथील वाहतूक पोलिसाने या वाहनांना अडविले तर पुन्हा ही वाहने मागे फिरून जुन्याच मार्गिकेत शिरण्यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे कोंडीत भर पडते.

यापूर्वी मोठे कंटनेर, अवजड मालवाहू ट्रक शिळफाटा रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत उभे करण्यासाठी जागा होती. ती जागा आता भंगारचालकांनी व्यापून टाकली आहे. भंगार साहित्य घेऊन आलेला कंटनेर, ट्रक रस्त्याच्या कोपऱ्यावर उभा करून रिकामा केला जातो. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. पोलीस, वाहतूक पोलीस उपस्थित नसल्याने हतबलतेने तो ट्रक, कंटनेर भंगार दुकानातून वळण घेऊन बाहेर पडेपर्यंत वाट पाहावी लागते, असे अनेक वाहनचालकांनी सांगितले. यामध्ये सर्वाधिक हाल कल्याण, बदलापूर परिसरातून पनवेल, नवी मुंबई, अलिबाग परिसरात नोकरी, व्यवसायासाठी जाणाऱ्यांचे होतात.

यासंदर्भात माहिती घेण्यासाठी ठाणे वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक नरेश दुर्मुले यांच्या ठाण्यातील कार्यालयात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही.

कुर्ल्यातील भंगार विक्रेत्यांची भर

कुर्ला येथील मुख्य रस्त्यावरील जुन्या भंगार विक्रेत्यांवर पालिकेने कारवाई केल्यामुळे कुर्ला येथील बहुतेक भंगार विक्रेते शिळफाटा भागात स्थलांतरित झाल्याचे कळते. या भंगार व्यावसायिकांवर राजकारणी, पोलीस, वाहतूक यंत्रणांचा वरदहस्त असल्याने त्यांना कोणीही हटवू शकत नाही, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.

शिळफाटा भागात भंगार साहित्य रस्त्याच्या बाजूला ठेवले असेल तर त्याची पाहणी केली जाईल. त्याचा वाहतुकीला अडसर होत असेल तर कारवाई केली जाईल.

– अमित काळे, उपायुक्त, वाहतूक विभाग